नवी दिल्ली: दिल्ली दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 28 मार्चपर्यंत ईडी कोठडीत पाठवले आहे. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की, यावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांची होळी ईडीच्या रिमांड रूममध्येच साजरी होणार आहे. न्यायालयाने मुख्यमंत्र्यांना सहा दिवसांच्या ईडी कोठडीत पाठवले आहे. ईडीने 10 दिवसांची रिमांड मागितली होती. त्याचवेळी मुख्यमंत्र्यांच्या वतीने अभिषेक मनु सिंघवी, विक्रम चौधरी आणि रमेश गुप्ता या तीन वकीलांनी कोठडीला विरोध केला होता.
सीएम केजरीवाल यांच्या रिमांडची मागणी करताना, ईडीने न्यायालयाला सांगितले की, मनी ट्रेल लपविण्यासाठी मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक पुरावे नष्ट करण्यात आले, जेणेकरून त्यांना कोणी पकडू शकत नाही. अनेक फोन नष्ट झाले. दिल्ली दारू घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना वित्तपुरवठा केल्याप्रकरणी अटक केली आहे. मनी लाँडरिंग कायद्यान्वये मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘मद्य धोरण गोवा निवडणुकीच्या निधीसाठी बनवले’
ईडीने न्यायालयाला सांगितले की, नवीन मद्य धोरण साउथ ब्लॉकच्या फायद्यासाठी तयार करण्यात आले होते. या संपूर्ण कटाचे मुख्य सूत्रधार मुख्यमंत्री केजरीवाल आहेत. ईडीने एकूण 10 दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. ईडीने न्यायालयाला सांगितले की, 9 समन्स पाठवूनही केजरीवालांनी तपासात सहकार्य केले नाही. त्यामुळेच त्यांना ताब्यात घेऊन चौकशी करण्याची गरज आहे. गोवा निवडणुकीच्या निधीबाबत दिल्ली दारू धोरणात बदल करण्यात आले. दिल्ली सरकार एखाद्या कंपनीप्रमाणे काम करत असल्याचे सांगण्यात आले. या धोरणातूनच गोवा निवडणुकीसाठी पैशांची व्यवस्था करण्यात आली.