लोणी काळभोर (पुणे): हवेली तालुक्यातील एका सेवाभावी संस्थेत दाखल असलेल्या मतिमंद मुलीवर संस्थेतील काळजीवाहक व्यक्तीनेच बलात्कार केल्याप्रकरणी सत्र न्यायालयाने त्याला १० वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड ठोठावला आहे.
शिवाजीनगर सत्र न्यायालयातील न्यायाधीश के. पी. नांदेडकर यांनी आरोपी शाम दिवाकर काकडे (वय. ६०) याला ही शिक्षा सुनावली आहे. तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. जून २०१६ च्या पुर्वीपासून ते मार्च २०१७ पर्यंत संबंधित मतिमंद मुलीवर शाम काकडे बलात्कार करत होता. अखेर २१ मार्च २०१७ रोजी त्या मुलीची प्रसूती झाली. तिने एका मुलाला जन्म दिला आहे. या संदर्भात हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पिडीत मुलगी मतिमंद असल्याने डॉक्टरांना ती वैद्यकीय तपासणीस सहकार्य करत नव्हती. तसेच ती पोलीसांना काहीही माहिती देत नव्हती. पोलीसांनी बालकल्याण समिती, मानसोपचार तज्ञ, दिव्यांग मुलांच्या शाळेतील तज्ञ आणि महिला दक्षता समिती यांची मदत घेऊन आरोपी निष्पन्न केला. मानसोपचार तज्ञांनी पिडीत मुलीकडे चिकित्सात्मक चौकशी केली. त्यावेळी तिने “शाम काकडे हे मला त्रास देतात, माझ्याकडून कामे करून घेतात. तसेच मला जेवण देत नव्हते. मला अनेक दिवसांपासून शारिरीक जबरदस्ती करत होते” असे सांगितले. पिडीत मुलगी ही मतीमंद असल्याने ती शाम काकडे यास कोणत्याही प्रकारचा विरोध करू शकत नव्हती.
दरम्यान करोनाच्या कालावधीत या गुन्ह्याचे तपास आधिकारी उपनिरीक्षक आर. के. वाईकर यांचे निधन झाले. अशा अवघड परिस्थितीमध्ये पोलीस खाते, सरकारी वकील यांनी अत्यंत हुशारीने आपली कामगिरी चोख बजावली. त्यामुळे आरोपीला शिक्षा सुनावण्यात आली आहे.
या गुन्ह्याचा तपास हवेली पोलीस ठाण्याचे तत्कालीन (सध्या सेवानिवृत्त) पोलीस निरीक्षक कैलास पिंगळे, उपनिरीक्षक आर. के. वाईकर यांनी अतिशय चांगल्या प्रकारे केला. अतिरिक्त सरकारी वकील म्हणून मारुती वाडेकर यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी कर्मचारी म्हणून हवालदार सचिन अडसूळ, सत्र न्यायालयात पैरवी अंमलदार म्हणून सहायक फौजदार विद्याधर निचीत व जिल्हा न्यायालय पैरवी अधिकारी म्हणून सहायक पोलिस निरीक्षक आकाश पवार यांनी काम पाहिले.