पुणे : गेल्या 10 दिवसांपासून ‘आपले सरकार’ या पोर्टलवर कृषि आयुक्तालयाच्या अखत्यारीत असलेली वेबसाईट ठप्प झाली असून, त्याचा नाहक भुर्दंड खते उत्पादक विक्रेत्यांना बसत आहे. लवकरच पावसाळा सुरु होत असून, खते उत्पादक विक्रेत्यांची आयुक्तालयात परवानगी घेण्याची लगबग सुरु आहे. असे असताना वेबसाईटच बंद दिसत असल्याने खते उत्पादक विक्रेत्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
कृषि आयुक्तालयामध्ये ऑनलाईन प्रणालीबाबत काही अडचणी आल्यास शासनाकडून दोन व्यक्तींची नेमणूक करण्यात आलेली आहे. परंतु, सदरच्या व्यक्ती या अधिकाऱ्यांना वेगळी माहिती देतात आणि खते उत्पादक विक्रेते यांना वेगळी माहिती देतात. अशाप्रमाणे दिशाभूल होत असून, खते उत्पादक व विक्रेते राज्यातील अनेक जिल्ह्यातून येत असतात. पर्यायाने त्यांची कामे न झाल्यामुळे संबंधितांना दोन ते चार दिवस काढावे लागतात.
यापूर्वी आपले सरकार पोर्टलबाबत खते उत्पादक विक्रेते यांनी कृषि आयुक्तालयामध्ये ऑनलाईन प्रणालीबाबत काही अडचणी आल्यास शासनाकडून नेमणूक व्यक्ती काहीच कामे करत नाही. तसेच हे लोक खते उत्पादक व विक्रेते यांची ऑनलाईन कामे करुन देण्याबाबत पैशांची मागणी करत असल्याच्या तक्रारी केलेल्या आहेत. परंतु, या तक्रारींना कृषि आयुक्तालयाकडून केराची टोपली दाखवण्यात आल्याचे निदर्शनास येते. तरी संबंधित व्यक्तींची तडकाफडकी बदली करुन त्यांच्या जागी योग्य व्यक्तीची नेमणूक करावी, अशी मागणी खते उत्पादक व विक्रेते करत आहेत.