पिंपरी : बेंगलोर ते पुणे या मार्गावर कंटेनरमधून ॲमेझॉन कंपनीच्या ४८ लाख रुपयांच्या वस्तू लंपास केल्याचा प्रकार समोर आला आहे. ॲमेझॉन कंपनीचे लॅपटॉप, मोबाईल आणि इतर महागड्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची वाहतूक करत असताना त्यामधील ४८ लाख रुपयांच्या महागड्या वस्तू लंपास केल्या आहेत. याप्रकरणी कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार १२ ते १४ मार्च या कालावधीत पुण्यातील आंबेठाण परिसरात घडला आहे.
याप्रकरणी अनुज सचिव तिवारी (वय २५ रा. वाघोली) यांनी म्हाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून शाहिद इलियास (२५, रा. राजस्थाान) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, फिर्यादी यांच्या सेंच्युरी कार्गो कॅरियर ट्रान्सपोर्ट फर्ममध्ये संशयित आरोपी हा कंटेनर चालक म्हणून काम करत होता. फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून त्याने बेंगलोर येथून ॲमेझॉन कंपनीचे लॅपटॉप, मोबाईल, इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू असा एकूण १ कोटी ५३ लाख ९३ हजार ३०० रुपयांचा माल घेऊन पुण्याच्या दिशेने येत होता.
त्यावेळी पुण्यातील आंबेठाण येथे आला असता त्यातील ४८ लाख ६९ हजार ९५३ रुपयांचा माल गहाळ झाला होता. या प्रकरणी कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.