राहुलकुमार अवचट
यवत : दारू पिऊन सार्वजनिक ठिकाणी गोंधळघालणार असाल, तर पहिली हि बातमी वाचाच! यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत दारू पिऊन सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणाऱ्या एका आरोपीला बारामती न्यायालयाने कारावासासह दंडाची शिक्षा ठोठाविली आहे. हि शिक्षा बारामती न्यायालयातील आर. के. देशपांडे यांच्या खंडपीठाने सुनावली आहे.
तानाजी नामदेव यादव (रा. भोसलेवाडी उंडवडी, ता. दौंड, जि.पुणे) अशी शिक्षा ठोठाविण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
यवत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, आपल्या देशात सार्वजनिक ठिकाणी धुम्रपण करणे, तसेच दारू पिणे गुन्हा मानला जातो. सामान्य नागरिकांना त्रास होऊ नये तसेच सामाजिक सुरक्षा अबाधित रहावी असा त्यामागील उद्देश आहे. मात्र आरोपी तानाजी यादव यानेसार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन गोंधळ घातला होता. याप्रकरणी यादववर दारूबंदी कायदा कलमान्वये यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
यवत पोलिसांनी आरोपी यादव याला अटक करून बारामती न्यायालयात हजर केले होते. सदर गुन्ह्यात आरोपी यादव दोषी आढळल्याने न्यायाधीश आर. के. देशपांडे यांच्या खंडपीठाने आरोपीला ३ महिने सश्रम कारावास व २ हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठाविली आहे. आणि दंड न भरल्यास १ महीना साध्या कारावासाची शिक्षा व ८५ (१), (२) मध्ये ३ महिने सश्रम कारावास व ५,०००/- रूपये दंड न भरल्यास १ महिना साधा कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.
दरम्यान, सदर गुन्हयाचा तपास सहाय्यक फौजदार पी टी ननवरे सध्या सेवानिवृत्त यांनी केला होता. तर कोर्ट पैरवी अमलदार सहाय्यक फौजदार एन.ए. नलावडे, पोलीस नाईक वेनुनाद ढोपरे यांनी कामकाज पाहिलेले आहे. तर सरकारी अभियोक्ता म्हणुन स्नेहल नाईक यांनी कामकाज पाहिले आहे.