पुणे : बिबट्यांकडून रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांवर होणारे हल्ले लक्षात घेऊन शेतीसाठी दिवसा वीज उपलब्ध करून देण्याची मागणी पत्राद्वारे शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. जुन्नर, आंबेगाव, शिरूर भागातील मानवी वस्तीत बिबट्यांचे नागरिकांवरील हल्ले वाढले आहेत. अशी चिंता खासदार कोल्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे व्यक्त केली आहे.
जुन्नर, आंबेगाव, शिरूर पट्ट्यात बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. मानवी वस्तीत जाऊन नागरिकांवर बिबट्यांनी हल्ले केल्याच्या घटना खूपच वाढल्या आहेत. या भागातील शेतकऱ्यांना शेतीसाठी सध्या रात्रीच्या वेळी वीजपुरवठा करण्यात येतो. शेताला पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना रात्रीच्या काळोखात जावे लागते. अशाच वेळी बिबट्यांकडून हल्ले होत आहेत.
अशा हल्ल्यात आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांचा बळी गेला असून कित्येकांना जायबंदी व्हावे लागले आहे. त्यामुळे बिबट प्रवण क्षेत्र असलेल्या या भागात शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा करण्याचा निर्णय तातडीने घ्यावा व तसे आदेश महावितरणला देण्यात यावेत. अशी मागणी खासदार कोल्हे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्राद्वारे केली आहे.