मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्हाच्या वादाच्या प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाला मोठा दिलासा दिला आहे. शरद पवार गटाला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह लोकसभा निवडणुकीपर्यंत वापरता येणार आहे. तसेच कोर्टाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हे नाव देखील वापरण्याची परवानगी दिली आहे. तसेच निवडणूक आयोगाने तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह राखीव ठेवावे आणि इतर कोणत्याही पक्षाला अथवा उमेदवाराला देऊ नये, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले .
तसेच अजित पवार गटाने प्रचारात मराठी, हिंदी, इंग्रजीमध्ये सर्व ठिकाणी हे डिक्लेरेशन देत नमूद करावे की, घड्याळ हे चिन्ह आम्हाला सुप्रीम कोर्टाच्या केसवर अटीशर्तींसह मिळालं आहे. खरी राष्ट्रवादी कुणाची याचा अंतिम फैसला झाल्यावर ते कायम होईल, असंही कोर्टानं म्हटलं आहे.
यानंतर शरद पवार गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मिडियावर एक पोस्ट करत आपली भूमिका मांडली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘सर्वोच्च न्यायालयाचा आजचा निकाल म्हणजे पोपटाला तडफडत ठेवून दिले आहे; फक्त मरण जाहीर करायचे आहे. आज सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीमध्ये पाच महत्वाची निरीक्षणे नोंदविली. त्यातील पहिले निरीक्षण म्हणजे, ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार’ हे नाव कायम ठेवण्यात आले. तुतारी हे पक्षचिन्ह लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी कायम असून महाराष्ट्रात इतर कोणालाही तुतारी हे पक्षचिन्ह वापरता येणार नाही, हेदेखील सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.
अजित पवार गटाकडून सादर करण्यात आलेले प्रतिज्ञापत्र हे अपूर्ण असल्याचे देखील न्यायालयाने म्हटले. प्रादेशिक पातळीवर तयार करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्राला मान्यता देता येणार नाही, असे सांगून राष्ट्रीय स्तरावरील प्रतिज्ञापत्र सादर करण्याबाबत सूचना न्यायालयाने केल्या. तसेच, जर अशा पद्धतीने लोक पक्ष बदलू लागले, तर दहाव्या अनुसूचीचे काय करायचे? असा प्रश्न युक्तिवादादरम्यान अजित पवार गटाच्या वकिलांना विचारला. सर्वात महत्वाचे म्हणजे, “तुम्हाला घड्याळ चिन्ह वापरता येईल. घड्याळ चिन्ह मिळालेले नाही. ते चिन्ह सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयावर अवलंबून आहे, असे प्रत्येक पोस्टरवर लिहावे लागणार आहे.” असेदेखील सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.
म्हणूनच मी म्हटले की पोपटाला तडफडत ठेवलं आहे. फक्त ते कधी मरतंय, याची वाट बघायची आहे. आजचा निकाल जरी घड्याळ चिन्ह देणारा असला तरी खाली जे लिहायचे आहे, “कोर्टाच्या अंतिम निकालाच्या अधीन राहून” यावरून कोर्टाला कुठे तरी जाणवलं आहे की, हा सर्व खोटारडेपणा झालेला आहे. फक्त निवडणुकीच्या तोंडावर कदाचित हे करणे शक्य झालेले नाही. त्यामुळेच कोर्टाने निकाल राखून ठेवला. मात्र, कोर्टाने इशारा तर देऊनच टाकला आहे, असंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.
सर्वोच्च न्यायालयाचा आजचा निकाल म्हणजे पोपटाला तडफडत ठेवून दिले आहे; फक्त मरण जाहीर करायचे आहे. आज मा. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीमध्ये पाच महत्वाची निरीक्षणे नोंदविली. त्यातील पहिले निरीक्षण म्हणजे, ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार’ हे नाव कायम ठेवण्यात आले. तुतारी हे… pic.twitter.com/1dC366WBwF
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) March 19, 2024