नवी दिल्ली: निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी लोकसभा निवडणूक 2024 संदर्भात एक मोठी भविष्यवाणी केली आहे. पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाची कामगिरी तृणमूल काँग्रेसपेक्षा चांगली असेल, असे त्यांनी म्हटले आहे. 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींच्या लाटेचा प्रभाव दिसून आला आणि भाजपने प्रत्येक मोठ्या राज्यात चांगली कामगिरी केली. तरी देखील पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या टीएमसीचे वर्चस्व कायम राहिले आणि भाजप येथे सर्वात मोठा पक्ष होऊ शकला नाही.
आता मात्र प्रशांत किशोर यांनी दावा केला आहे की, 2024 मध्ये भाजपला पश्चिम बंगालमध्ये टीएमसीपेक्षा जास्त जागा मिळतील. ईशान्य आणि दक्षिण भारतीय राज्यांमध्येही भाजपच्या जागा वाढतील, पण 370 जागा जिंकण्याचे पंतप्रधान मोदींचे स्वप्न पूर्ण होणे कठीण आहे, असेही प्रशांत किशोर म्हणाले. पंतप्रधान मोदींची लोकप्रियता आणि प्रबळ विरोधी पक्ष नसल्यामुळे एनडीए आघाडीला फायदा होत आहे, असेही ते म्हणाले.
बंगालचे निकाल आश्चर्यचकित करतील:
प्रशांत किशोर यांच्या मते एनडीए आघाडीचे 400 हून अधिक जागा जिंकण्याचे लक्ष्य गाठणे कठीण आहे, परंतु पश्चिम बंगालमध्ये आश्चर्यकारक निकाल लागतील. ते म्हणाले, “मला कोणतेही भाकित करायचे नाही, पण पश्चिम बंगालमध्ये भाजपची कामगिरी टीएमसीपेक्षा चांगली असेल. येथील निवडणुकीचे निकाल आश्चर्यकारक आणि भाजपच्या बाजूने असतील.