बारामती: माझ्यासह अनेक नेते आयुष्यभर राष्ट्रवादी विरोधात लढत आलो आहोत. परंतु, आता राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हाला पाठिंबा दिल्यामुळे काही लोक आमच्यावर टीका करतात. पण राजकारणात परिस्थिती आणि वेळेनुसार निर्णय घ्यायचे असतात. आम्हाला शरद पवार यांचा पराभव हा जास्त महत्त्वाचा वाटतो”, अशी भावना भाजपाचे नेते आणि उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. २०१९ मध्ये केवळ शरद पवारांमुळेच आमचे सरकार गेले, असेही ते म्हणाले. महाराष्ट्रातील जनतेने महायुतीचे १६१ आमदार निवडून दिले होते. पण शरद पवारांनी शिवसेनेला बाजूला करत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. यामध्ये आमचे नाही, पण जनतेचे मोठे नुकसान झाले. महाविकास आघाडीच्या काळात काहीही विकास झाला नाही, असाही आरोप पाटील यांनी केला. बारामती येथे पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली.
यावेळी चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, “शरद पवार यांनी आम्ही तुमच्याबरोबर सरकार स्थान करतोय, असं सांगून संपूर्ण जग ज्यांना मानते, अशा माझ्या दोन नेत्यांना झुलवत ठेवलं. आज मला शरद पवार यांचा हिशोब चुकता करण्याची संधी चालून आली आहे. त्यामुळे अजित पवारांना भाजपने बरोबर का घेतलं? असे प्रश्न माझ्यासाठी महत्त्वाचे नाहीत. मला फक्त पवारांचा पराभव हवा आहे, असं देखील पाटील म्हणाले.
दरम्यान, बारामती लोकसभा मतदारसंघात सध्या महायुतीच्या नेत्यांमध्येच वाद सुरू आहेत, असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांना विचारला. त्यावर ते म्हणाले, आमच्याकडे असणारं देवेंद्र फडणवीस हे औषध सर्वांना लागू पडतं. ते या वादावर लवकरच मार्ग काढतील. हर्षवर्धन पाटील असो किंवा अन्य कुणीही असो पुढच्या आठवड्यात सर्व लोक बारामतीत एकत्र फिरताना आपल्याला दिसतील, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.