नवी दिल्ली: आगामी लोकसभा आणि काही राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करण्यासाठी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद शनिवार १६ मार्च रोजी दुपारी ३ वाजता होणार आहे. याबाबत निवडणूक आयोगाने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर माहिती दिली आहे.
देशातील सर्व पक्षांनी लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून भाजप, काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि आम आदमी पार्टीनेही त्यांच्या उमेदवारांच्या याद्या जाहीर करत आघाडी घेतली आहे. २०१९ मध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका ११ एप्रिल ते १९ मे दरम्यान एकूण सात टप्प्यांत पार पडल्या आणि २३ मे रोजी मतमोजणी झाली होती.
या घोषणेनंतर लोकसभा निवडणुकीचा राजकीय लढाईचा टप्पा निश्चित होणार आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार तिसरी टर्म जिंकण्याची, तर विरोधक इंडिया आघाडीअंतर्गत एनडीएला धक्का देण्याची तयारी करत आहेत. दरम्यान, आदर्श आचारसंहिता निवडणूक घोषणा झाल्यानंतर लगेचच लागू होते. ती आता उद्यापासून लागू होणार आहे.
Press Conference by Election Commission to announce schedule for #GeneralElections2024 & some State Assemblies will be held at 3 pm tomorrow ie Saturday, 16th March. It will livestreamed on social media platforms of the ECI pic.twitter.com/1vlWZsLRzt
— Spokesperson ECI (@SpokespersonECI) March 15, 2024