बारामती : इंदापूर परिसरातील साखर कारखान्यावर ऊसतोडीचे काम करणाऱ्या कामगाराच्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला ५० हजारांच्या जातमुचलक्यावर विविध अटी-शर्तींनुसार जामीन मंजूर केला आहे. हे आदेश बारामती येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश मे. देशपांडे यांनी मंजूर केला आहे.
प्रवीण अंबादास सुरवसे असे जमीन मंजूर झालेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पिडीत मुलीच्या आईने इंदापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदापूर परिसरात ऊसतोड कामगार असलेल्या कुटुंबातील अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन आरोपीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच जातीवाचक शिवीगाळ केली होती. या प्रकरणी पिडीत मुलीच्या आईने इंदापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. हा प्रकार जानेवारी २०२३ मध्ये घडला होता.
याप्रकरणी आरोपीविरोधात इंदापूर पोलीस ठाण्यात बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम कलम व अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम कलमाअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर इंदापूर पोलिसांनी आरोपी प्रवीण सुरवसे याला अटक केली होती.
गुन्ह्याचा खटला हा बारामती येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात सुरु होता. या गुन्ह्यात आरोपीने ॲड. गणेश माने यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. या खटल्यात ॲड. गणेश माने यांनी सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाच्या विविध न्यायनिवाड्यांचा दाखला देत सदर आरोपीस जामीन मंजूर करण्याची विनंती केली.
दरम्यान, आरोपीने कोणत्याही प्रकारे जातीवरून अपमानित केल्याचे व शिवीगाळ केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत नाही, त्यामुळे त्याच्याविरुद्ध अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्याचे कलम लागू होणार नाहीत. त्याचप्रमाणे सदर पीडितेवर तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचे वैद्यकीय पुरावे स्पष्ट होत नाहीत.
दरम्यान, सदर खटल्याचे गुण-दोषांवर कामकाज चालण्यास बराच कालावधी जाण्याची शक्यता आहे. यांसह विविध कायदेशीर बाबींवर ॲड. माने यांनी युक्तिवाद केले. हे युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीस ५० हजार रुपयांचा ऐपतदार जामिन मंजूर केला केला. तर या खटल्यात ॲड. गणेश माने यांना ॲड. धनंजय गलांडे, ॲड. उमेश मांजरे आणि ॲड. आकाश भोसले यांची मदत मिळाली.