राहुलकुमार अवचट
यवत : समाजातील प्रत्येक सामान्य नागरीक हा गणवेश न घातलेला पोलीसच असतो. काही नागरीक हे पोलीस दलात त्यांचे कर्तव्य पार पाडतांना निस्वार्थी भावनेने मदत करत असतात. महिलांवरील व बालकांवरील अत्याचार तसेच इतर गंभीर गुन्हे, ज्यामध्ये साक्षीदार यांनी पिडीत कुटुंबियांशी कोणतेही नातेसंबंध नसतांना सामाजिक जाणीव ठेवुन खऱ्याच्या बाजुने साक्ष दिल्याने आरोपींना न्यायालयाकडुन शिक्षा सुनावण्यात आली. पुणे ग्रामीण घटकातील गुन्हयामध्ये साक्ष दिल्यामुळे आरोपींना शिक्षा सुनावण्यात आल्या आहेत. त्यातच यवत (ता. दौंड ) येथील बलात्कारातील गुन्ह्यात साक्षीदार प्रशांत शिंदे यांचा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते नुकताच सन्मान करण्यात आला आहे.
पुण्यातील पोलीस मुख्यालय भिमाशंकर हॉल येथे शनिवारी (ता. १५) पुणे ग्रामीण पोलीस दल स्मृतिचिन्ह अनावरण सोहळा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पार पडला. यावेळी दिवंगत पोलिसांच्या कुटुंबियांना कोविड योध्दा म्हणुन स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देवून पालकमंत्री चद्रकांत पाटील यांच्या हस्ते देण्यात आले आहे. तसेच विविध गुन्ह्यातील ९ साक्षीदारांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, उषा लक्ष्मण, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, पुणे ग्रामीण पोलीस दलातील विविध शाखांचे अधिकारी, अंमलदार, दिवंगत पोलीस पाटील यांचे कुटुंबिय उपस्थित होते.
पोलीस म्हटलं की अनेक जणांना धडकी भरते, तशातच एखादा गुन्हा घडल्यास त्या ठिकाणी तपास करताना पोलिसांना पंच,साक्षीदार यांची गरज भासते परंतु अनेक वेळा कशाला मध्ये पडायचे आणि कोर्टाचे हेलपाटे मारायचे असे विचार करुनअनेकजण पंच – साक्षीदार होण्यासाठी तयार होत नाहीत याचा फायदा अनेकवेळा गुन्ह्यातील आरोपीला झाल्याचे दिसून आले आहे.
अनेकवेळा असेही पाहायला मिळाले आहे की पोलिसांना दिलेली साक्ष कोर्टात गेल्यानंतर पलटली जाते,अशा वेळी पोलिसांनी रात्रंदिवस मेहनत करून आरोपीला शिक्षा होण्यासाठी केलेला तपास अक्षरशः वाया जातो,आणि ज्या व्यक्तीवर अन्याय झाला आहे त्याला न्याय मिळत नाही. परंतु, ९ साक्षीदारांनी दिलेल्या साक्षीमुळे गुन्हेगारांना शिक्षा मिळाली आहे. आशी कामगिरी केल्याबद्दल प्रशांत लक्ष्मण शिंदे यांचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.
यावेळी बोलताना पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख म्हणाले कि, सर्वसामान्य नागरिकांचासुद्धा पोलिसांचा खूप मोठा आधार आहे. कुठलाही गुन्हा घडल्यास नागरिकांनी पुढाकार घेऊन आपल्याला माहिती असलेली पोलिसांना देणे गरजेचे आहे. तसेच जर गुन्हा घडताना स्वतः पाहिला असेल तर साक्षीदार पंच होऊन पीडित व्यक्तीला न्याय मिळवून दिला पाहिजे. पीडित व्यक्तीला व पोलीस प्रशासनाला मदत केल्याबद्दल संपूर्ण पुणे ग्रामीण पोलीस आपले आभार मानत असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सांगितले.तसेच प्रशांत शिंदे यांचे कौतुक करून आभार मानले.