मुंबई : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर डेलकर कुटुंबीयांनीही ठाकरेंची साथ सोडली आहे. भारतीय जनता पक्षाने आपल्या दुसऱ्या यादीमध्ये कलाबेन डेलकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. हक्काचा उमेदवार फुटल्याने उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे.
भारतीय जनता पक्षाने बुधवारी जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत पहिलेच नाव कलाबेन डेलकर यांचे आहे. त्यांना दादरा नगर हवेली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी कलाबेन डेलकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सहकुटुंब भेट घेतली होती. त्यावेळी डेलकर कुटुंब कार्यकर्त्यांशी संवाद साधून अंतिम निर्णय घेईल, असे सांगण्यात आले होते.
कलाबेन डेलकर दिवगंत खासदार मोहन डेलकर यांच्या पत्नी आहेत. मोहन डेलकर यांनी 2021 साली मुंबईतील नरिमन पाँईट येथील सी ग्रीन हॉटेलमध्ये आत्महत्या केली होती. डेलकर यांच्या आत्महत्येसाठी दरा नगर हवेली स्थानिक प्रशासनाला जबाबदार धरले गेले होते. मोहन डेलकर यांच्या मृत्यूनंतर पोटनिवडणुकीमध्ये कलाबेन डेलकर यांनी शिवसेना पक्षानी उमेदवारी दिली होती.