पुणे : पुण्यातील मुळशीतील मुगावडे येथे खोट्या कागदपत्रांच्या साह्याने प्लॉट विक्री करत एका ग्राहकाची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक राहुल नहारसह तिघांवर फसवणूक आणि अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २०१० पासून आतापर्यंत सुरु होता.
या प्रकरणी कोरेगाव पार्क येथे राहणारे साबीर नजीर अहमद शेख या ग्राहकाने फिर्याद दिली आहे. त्यानुसार हिंजवडी पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक राहुल रसिकलाल नहार, कंपनीचे व्यवस्थापक साई केरकर आणखी एक अनोळखी व्यक्ती यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख यांनी मालक राहुल नहार यांच्याकडून मुळशी तालुक्यातील मुगावडे गावातील ऑलम्पिया प्लॉटिंग स्कीमबाबत वर्तमानपत्रात जाहिरात पाहिली. त्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी जाऊन भेट दिली. त्यावेळी तक्रारदार यांना या स्कीमच्या मार्केटिंग व सेल्स टीमचे सुनील ओझा, चेतन ठक्कर, शैलेश दवे यांनी त्यांना स्कीमविषयी माहिती दिली.
सेल्स टीम व नहार यांच्या सांगण्यावर विश्वास ठेवून तक्रारदाराने ७ हजार ६३५ चौरस फुटांचा प्लॉट खरेदी करण्याचे ठरवले. यानंतर ३० जुलै २०१० खरेदी देणार एक्सर्बीया डेव्हलपर्सचे मालक राहुल नहार यांच्या मार्फत कुलमुखत्यारधारक म्हणून योगेश नारायण निकम यांच्याकडून या प्लॉटचे ‘ॲॅग्रीमेंट टू सेल’सह दुय्यम निबंधक मुळशी क्रमांक २ यांच्या कार्यालयात केले.
त्या बदल्यात राहुल नहार यांना २६ लाख ५२ हजार ३०० रुपये वेळोवेळी रोख व धनादेश स्वरूपात तक्रारदाराने दिले. मात्र खरेदीखत करून देण्यास टाळाटाळ केली. तक्रारदार यांनी नहार यांना खरेदीखत का करून देत नाही, असं वेळोवेळी विचारले असता त्यांनी कंपनीच्या नियमानुसार सुरुवातीला आम्ही ‘ॲॅग्रीमेंट टू सेल’ करून घेतो आणि नंतर खरेदी खत करून देतो, असं सांगितले. या करारनाम्यानुसार नहार यांनी संबंधित प्लॉटचा ताबा दिला नाही. तसेच खरेदीखत करून देण्यास चालढकल करत वारंवार टाळाटाळ केली, असं तक्रारीत म्हटले आहे.