दौंड (पुणे) : दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. गेल्या १५ दिवसांत अज्ञात चोरट्यांनी तब्बल १ लाख ६१ हजार रुपयांच्या ३ मोटारसायकल चोरून नेल्याच्या घटना घडल्या आहेत. या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संजय किसन दिवेकर (वय – ५०, व्यवसाय डॉक्टर, रा. शालीमार चौक, फॉरेस्ट कॉर्टरसमोर, दौड, ता. दौंड), कांतीलाल किसन बनकर (वय- ५५, व्यवसाय शेती, रा. गिरीम मेरी मेमोरिअल शाळेपाठीमागे ता. दौंड) व मुरलीधर बाबा जाधव (वय- ४९, व्यवसाय शेती, रा. जाधववाडी, गिरीम, ता. दौंड),अशी दुचाकी चोरी गेलेल्या मालकांची नावे आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय दिवेकर हे शुक्रवारी (ता. ८) सकाळी पावणेसहा वाजण्याच्या सुमारास होंडा युनिकॉर्न मोटारसायकल व्यायामासाठी घरून घेऊन गेले होते. दौंड गावच्या हद्दीतील बोरावकेनगर चौक उपसरपंच चहा हॉटेलपासून जवळच लिंगाळी रोडच्या कडेला मोटारसायकल हॅण्डल लॉक करुन व्यायामासाठी गेले होते. सात वाजण्याच्या सुमारास मोटारसायकल लावलेल्या ठिकाणी दिसली नाही. आजूबाजूच्या परिसरामध्ये शोध घेतला; परंतु ८१ हजार रुपयांची मोटरसायकल आढळली नाही. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात फिर्याद दिली आहे.
दुसऱ्या घटनेत कांतीलाल बनकर हे गुरुवारी (ता. ७) मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास घरासमोरील गोठ्यातील काम करुन घरामध्ये झोपण्यासाठी जात असताना हिरो कंपनीची मोटारसायकल ही घरासमोर लावलेली होती. त्यानंतर सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास झोपेतून उठून गोठ्यातील कामे करण्यासाठी बाहेर आले असता, त्यांना मोटारसायकल लावलेल्या ठिकाणी दिसली नाही. गिरीम, बेटवाडी, नानवीज, दौंड शहरामध्ये आजूबाजूच्या परिसरामध्ये शोध घेतला; परंतु ५० हजार रुपयांची मोटरसायकल आढळून आली नाही.
दरम्यान, मुरलीधर जाधव हे १५ फेब्रुवारीला रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर स्लस मोटारसायकल घरासमोर लावून झोपी गेले होते. सकाळी १६ तारखेला सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास झोपेतून उठून घराबाहेर येऊन मोटारसायकल लावलेल्या ठिकाणी आले असता, मोटारसायकल त्यांना दिसली नाही. तसेच शेजारी राहणाऱ्या जयराम वामन खुडे (रा. जाधववाडी, गिरीम) यांच्याही घरी चोरी झाल्याची माहिती मिळाली. त्यानुसार आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला; परंतु ३० हजार रुपयांची दुचाकी आढळली नाही. वरील तिघांनी दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात चोरट्यांविरोधात दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा अधिक तपास दौंड पोलीस करीत आहेत.