छत्रपती संभाजीनगर : शालेय जीवनापासून दोघांची मैत्री, पुढे तारुण्यात त्यांचे प्रेम जुळले. त्याने लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी संबंध ठेवल्याने ती गर्भवती राहिली. गर्भपात कर, नंतरच लग्न करेन, असे सांगून तिला गर्भपात करायला लावला. त्यानंतरही त्याने तिच्याशी लग्न काही केले नाही. अखेर तिने गळफास घेत आयुष्य संपवलं.
ऋषीकेश विनायक तळेकर व त्याची आई सुरेखा विनायक तळेकर अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. तर अंकिता अनिल मोरे (वय २४) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. संबंधित तरुणीच्या मामाने दिलेल्या तक्रारीवरून चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
अंकिताचे मामा संतोष पांडूरंग हुजदार (पिसादेवी) यांनी तक्रार दिली. अंकिता ही क्रेडिट कार्ड ऑफिसमध्ये खासगी नोकरी करत होती. ऋषीकेश तळेकर आणि अंकिता हे दोघे 2018 पासून रिलेशनमध्ये होते. याच दरम्यान हा प्रकार घडला. त्यानंतर लग्नाला नकार देताच तरुणीने जीवन संपवले.