पुणे : पुण्यातील एरंडवणे परिसरातील एका ज्येष्ठ नागरिकाची २ लाखाची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. बँकेचा कर्मचारी बोलत असल्याचे सांगून केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने ज्येष्ठाला गंडा घातल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत नारायण दत्तात्रय निमकर (७०) यांनी रविवारी १० मार्च रोजी डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, फिर्यादींना ८ मार्च २०२४ रोजी अनोळखी मोबाइल क्रमांकावरून फोन आला होता. युनियन बँक ऑफ इंडियाचे कर्मचारी असल्याचे सांगून तुमचे घोलेरोड येथील शाखेत असलेल्या बँक खात्याचे केवायसी अपडेट करायचे बाकी आहे, आजची शेवटची तारीख आहे असे सांगितले. त्यानंतर पॅन कार्ड अपडेट करण्यासाठी फिर्यादींना एक लिंक पाठवली. त्यानंतर त्यांना ती लिंक ओपन करून त्यात खासगी माहिती भरायला सांगितली.
या माहितीचा वापर करून फिर्यादींच्या खात्यातून परस्पर २ लाख १३ हजार रुपये काढून घेतले. त्यांनतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तत्काळ पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यावरून डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक साळुंखे करत आहेत.