उरुळी कांचन (पुणे) : उरुळी कांचन-अष्टापूर मार्गावरील भवरापूर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील नदीच्या पुलाजवळ बोलेरो कार व आयशर टेम्पोचा भीषण अपघात झाला. या अपघातात बोलेरो गाडीतील दोघेजण गंभीर जखमी झाले असून, त्यांना लोणी काळभोर (ता. हवेली) येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
सोमवारी (ता. ११) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. हा अपघात एवढा भीषण होता की, यातील चारचाकी गाडी दोनवेळा पलटी झाल्याची माहिती उपस्थित नागरिकांनी दिली. या अपघातात जखमी झालेल्या दोघांचीही नावे अद्याप समजलेली नाहीत.
मिळालेल्या माहितीनुसार, बोलेरो कार अष्टापूर मार्गावरून उरुळी कांचन याठिकाणी निघाली होती. या वेळी भवरापूर ग्रामपंचायत हद्दीतील नदीच्या पुलाजवळ भरधाव वेगातील बोलेरो चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले व समोर असलेल्या एका आयशर टेम्पोला त्याने जोरदार धडक दिली. या अपघातात गाडी दोनवेळा उलटली. यामध्ये आयशर टेम्पो व गाडीचे मोठे नुकसान झाले.
दरम्यान, या चारचाकी गाडीतील दोन जखमींना अष्टापूर येथील नितीन कोतवाल, सोमनाथ कोतवाल, विकास कटके, अनिल रणसिंग यांनी तत्काळ मदत केली. जखमींना उरुळी कांचन येथील कस्तुरी रुग्णवाहिकेशी संपर्क साधून लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटल या ठिकाणी पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…