पिंपरी चिंचवड : दुचाकी चोरणाऱ्या अट्टल चोरट्याला भोसरी गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून चोरी केलेल्या तब्बल ३ लाख ८४ हजार किमतीच्या १६ मोटरसायकली जप्त करण्यात भोसरी तपास पथकाला यश आले आहे. योगेश शिवाजी दाभाडे, (वय २४ वर्ष, रा. वळसाने, ता.साकी जि. धुळे) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीच नाव आहे. आरोपी दाभाडे हा अट्टल मोटार सायकल चोरटा असुन त्याच्यावर पिंपरी चिंचवड, नाशिक शहर, नाशिक ग्रामीण, जळगाव ग्रामीण, धुळे ग्रामीण पोलीस ठाण्यात मोटार सायकल चोरीचे १७ गुन्हे दाखल आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी कि, भोसरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वनाथ चव्हाण यांच्या आदेशाने पोलीस उप निरीक्षक बालाजी जोनापल्ले, पोलीस उप निरीक्षक मुकेश मोहारे यांनी तपास पथकाच्या दोन वेगवेगळ्या टीम तयार करून भोसरी परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी वाहन चोरीच्या अनुषंगाने पेट्रोलींग तसेच सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता रेकॉर्डवरील आरोपी योगेश दाभाडे याला ताब्यात घेतले.
त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने आणि त्याचा साथीदार मॉन्टी वाघ (वय २२ वर्षे रा. दहिवत ता. चाळीसगाव जि. जळगाव) या दोघांनी १६ दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. दरम्यान, भोसरी, चाकण, म्हाळुंगे, खडकी, तळेगाव दाभाडे, लोणीकंद, सांगवी या परीसरातुन चोरी केलेल्या तब्बल सोळा मोटारसायकल आरोपीकडून जप्त करण्यात आलेल्या आहेत.
ही कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, मा.अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, मा.पोलीस उपायुक्त परिमंडळ १ स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त पिंपरी विभाग विशाल हिरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वनाथ चव्हाण, पोलीस निरीक्षक रूपाली बोबडे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बालाजी जोनापल्ले, पोलीस उपनिरीक्षक मुकेश मोरे, पोलीस हवलदार हेमंत खरात, पो.ना नवनाथ पोटे, पो.ना प्रकाश भोजने, मपोना मुळे, पोलीस अंमलदार स्वामी नरवडे, सागर जाधव, आशिष गोपी, प्रभाकर खाडे, सचिन सातपुते, महादेव गारोळे, ज्ञानेश्वर साळवे, यांनी केली.