धायरी (पुणे) : पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरातील गोऱ्हे बुद्रुक येथे १० ते १५ तरुणांनी भर रस्त्यात तिघांवर कोयत्याने वार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात नचिकेत संजय जगताप, ऋषिकेश दिलीप जगताप, निलेश हिरामण शहा हे तीन तरुण जखमी झाले आहेत. जखमी तरुणावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत आत्तापर्यंत ८ आरोपींना हवेली पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी गणेश खुडे हा मैत्रिणीसोबत दुचाकीवरून जात असताना गणेशला नचिकेत जगताप याने अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून मारहाण केली होती. याचा राग मनात धरून गणेश याने इतर १० ते १५ जणांना बोलावून घेतले. तसेच गोऱ्हे बुद्रुक येथे जाऊन जगताप व इतर दोन जणांवर हल्ला केला. यात जगताप याच्या पाठीवर,पायांवर,हातांवर व कमरेवर खोल जखमा झाल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच हवेली पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन वांगडे यांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली. तसेच आरोपींना शोधण्यासाठी वेगवेगळी पथके तयार करून रवाना केली.
अवघ्या चोवीस तासांत गणेश राजू खुडे (वय: २४वर्षे, रा. धायरी फाटा, वडगाव खुर्द) सोमनाथ गुलाब पवार (वय: १९ वर्षे, रा. मारुती मंदिराच्या मागे, धायरी) यश चंद्रकांत जवळकर (वय: १९ वर्षे, रा. खानापूर, ता. हवेली) अनिरुध्द अमित ठाकुर (वय: १९ वर्षे, रा. खडकचौक, धायरी) ओंकार संतोष पोळेकर (वय: १९ वर्षे, रा. भैरवनाथ मंदीराच्या समोर, धायरी) हमजा कमरअली शेख (वय: २२ वर्षे, रा. जिजाऊ संकुल, भैरवनाथ मंदीर, धायरी) व इतर दोन विधीसंघर्षित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. इतर आरोपींचा शोध सुरू असल्याचे हवेली पोलिसांनी सांगितले.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, यांच्या सूचना व आदेशानुसार पोलीस उपअधीक्षक भाऊसाहेब ढोले, हवेली ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन वांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सागर पवार, पोलीस हवालदार तोडकर, पोलीस नाईक गायकवाड, धनवे, पोलीस अंमलदार चौधरी, काळे, शिंदे आदींच्या पथकाने केली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सागर पवार करीत आहेत.