शिरूर : झाडे तोडणारे ठेकेदारावर कारवाई न करण्यासाठी १० हजाराची लाच स्वीकारताना शिक्रापूर येथील वनपरिमंडळ अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शिरूर येथील वनपरिक्षेत्रीय कार्यालयातून बुधवारी (ता.१२) रंगेहाथ पकडले आहे.
प्रविण अर्जुन क्षीरसागर (वय ४०, पद वनपरिमंडळ अधिकारी, शिक्रापूर, वर्ग- ३, नेमणूक वनपरिमंडळ कार्यालय शिक्रापूर) असे रंगेहाथ पकडलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी एका ४३ वर्षीय ठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे एक झाडे तोडणारे ठेकेदार आहेत. त्यांनी ठेका घेतलेली झाडे तोडून विची टेम्पोने वाहतूक करीत असताना, त्यांचा टेम्पो आरोपी लोकसेवक क्षीरसागर यानी ताब्यात घेतला होता. टेम्पो सोडण्यासाठी व पुन्हा कारवाई न करण्यासाठी आरोपी क्षीरसागर यांनी तक्रारदार यांच्याकडे १० हजार लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
मिळालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शिरूर वनपरिक्षेत्रीय कार्यालयात बुधवारी (ता.१२) सापळा रचला. तेव्हा तक्रारदार यांच्याकडून १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना आरोपी क्षीरसागर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. याप्रकरणी आरोपी क्षीरसागर याच्यावर शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरी, पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक भारत साळुंखे करीत आहेत.
सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे.