राहुलकुमार अवचट
यवत : जेसीबी मशीन बांधावर लावल्याच्या कारणावरून पाटस येथे दोन गटांत हाणामारी झाली. दोन्ही गटांतील सदस्यांनी एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी व लोखंडी गजाने मारहाण केल्याने गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी दिलेल्या तक्रारीवरून यवत पोलीस ठाण्यात तिघांविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, २९ फेब्रुवारी रोजी पाटस गावच्या हद्दीतील पानसरे यांच्या शेताच्या बांधावर जेसीबी मशीन लावल्याच्या कारणावरून धनाजी किशोर पानसरे, उषाबाई किशोर पानसरे, बाळूबाई देविदास पानसरे (सर्व रा. पाटस, आव्हाडवस्ती, ता. दौंड, जि. पुणे) यांनी शितल अमोल पानसरे यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली, तर अमोल पानसरे यांना धनाजी पानसरे याने लोखंडी गजाने मारहाण केल्याने, त्यांच्या डाव्या हाताच्या बोटांना दुखापत झाली. या वेळी पत्नी शितल हिच्या गळयातील मंगळसुत्र गहाळ झाल्याची फिर्याद अमोल पानसरे यांनी यवत पोलीस स्टेशन येथे दिली आहे. तक्रारीवरून धनाजी किशोर पानसरे, उषाबाई किशोर पानसरे, बाळूबाई देविदास पानसरे यांच्याविरुद्ध यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा पुढील तपास यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार देवकाते करीत आहेत.