वाकड: इन्स्टाग्रामवरून पोलिस उपनिरीक्षक असल्याचे सांगून तरुणीशी ओळख वाढविली. त्यानंतर तरुणीला चॅटिंग व फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर तिला ‘ब्लॅकमेल करत तिच्याकडून पैसे घेऊन लग्नाची व शारीरिक सुखाची मागणी केली. हा प्रकार वाकड येथे 4 जानेवारी ते 1 मार्च 2024 या कालावधीत घडला. याबाबत एका 24 वर्षीय तरुणीने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी शुभम राठोड (30, रा. चिंचवड) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम याने ‘पीएसआय शुभम राठोड’ या नावाच्या एका इन्स्टाग्राम आयडीवर दुसऱ्याच एका पीएसआयचा फोटो वापरला. त्यावरून व्हॉट्सॲप तसेच काॅल करून तरुणीशी संपर्क साधला. त्यानंतर शुभमने पीएसआय असल्याचे सांगून तरुणीशी ओळख वाढविली. तसेच तिच्याशी लग्न करायचे आहे, असे सांगून तिचे फोटो मिळवले. ते फोटो व चॅटिंग व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल करून तिच्याकडून वेळोवेळी आठ हजार आठशे रुपये घेतले. त्यानंतर त्याने आणखी पैशांची मागणी केल्याने तरुणीने त्याला नकार दिला. नकार दिल्यानंतरही शुभम याने वारंवार फोनवरून, व्हॉट्सॲपवरून लग्नाची, शारीरिक सुखाची व पैशांची मागणी केली. अखेर तरुणीने पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक अर्जून पवार अधिक तपास करीत आहेत.