लोणी काळभोर : पुणे-सोलापूर महामार्गावरील लोणी स्टेशन (ता. हवेली) चौकातील धोकादायकरीत्या असलेल्या सिग्नल आज गुरुवारी (ता.१३) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास कदमवाकवस्ती ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने हटविण्यात आला आहे. त्यांमुळे कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-सोलापूर महामार्गावर वाहनांची दररोज मोठी वर्दळ असते. वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढल्याने वाहतूक कोंडी ही तर नित्याची बाब झाली आहे. वाहतुकीचे नियमन करताना पोलिसांच्या नाकी नऊ येत आहे. त्यातच सोलापूरकडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने लोणी स्टेशन चौकातील सिग्नलला काल बुधवारी (ता.१२) मध्यरात्री धडक दिली. आणि वाहनचालक घटनास्थळावरून निघून गेला.
या अपघातात सिग्नल रस्त्यावरच धोकादायकरीत्या वाकला होता. त्यामुळे या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांना धोका निर्माण झाला होता. सोलापूरकडून येणारी वाहने चौकात येताना सिंगलला धडकून मोठा अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हा धोका टाळण्यासाठी कदमवाकवस्ती ग्रामपंचायत प्रशासनाने तत्काळ पुढाकार घेऊन चौकातील सिग्नल हटविला आहे.
दरम्यान, पुणे सोलापूर महामार्गावर नेहमीच लहान-मोठे अपघात घडतात तर लोणी स्टेशन चौक हे तर अपघाताचे ठिकाणच बनले आहे. या रस्त्यावर आजतागायत अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. प्रशासनाच्या वतीने नागरिकांच्या सेवेसाठी दोन महिन्यांपूर्वी चौकात सिग्नल बसविण्यात आले आहेत. परंतु, अद्यापही सिग्नल सुरु झालेले नाहीत. सिग्नल चालू होण्यासाठी मुहूर्त कधी निघणार आहे. असा सवाल नागरिक करीत आहेत.
याबाबत बोलताना कदमवाकवस्तीच्या सरपंच गौरी गायकवाड म्हणाल्या कि, लोणी स्टेशन चौकात अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत सिग्नल रस्त्यावर झुकला होता. त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना धोका निर्माण झाला होता. नागरिकांच्या सुरक्षेसाठी हा सिग्नल काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आणि काढलेला सिग्नल दुरुस्त करून लवकरच पुन्हा बसविण्यात येणार आहे.