राहुलकुमार अवचट
यवत, (पुणे) : पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्याशी संबधित जलसंपदा विभागाच्या विविध प्रलंबित समस्यांबाबत जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सचिव श्रीकर परदेशी यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली. या बैठकीला जलसंपदा सचिव संजय बेलसरे, कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणेचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, पुणे पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता हनुमंत गुणाले, अधिक्षक अभियंता प्रविण कोल्हे, धुमाळ, उपसचिव संजय टाटू आदी मान्यवर उपस्थित होते.
बैठकीत केलेल्या मागण्या
- खडकवासला जुना मुठा उजवा कालवा कुंजीरवाडी – लोणीकाळभोर, ता. हवेली ते भागवतवस्ती पाटस, ता. दौंड असा एकूण ६७ कि. मी. लांबी अस्तरीकरण व मजबूतीकरण या कामासाठी राज्य शासनाकडून सुमारे १८८.७५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून त्याची निविदा प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यात यावी.
- खडकवासला कालवा ते फुरसुंगी लोणीकाळभोर पर्यंत बंद नळी कालव्याच्या प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे सादर करून तातडीने मान्यता देण्यात यावी.
- पुरंदर उपसा सिंचन योजनेचे व जनाई – शिरसाई उपसा सिंचन योजनेचे फेरसर्वेक्षण करून योजना पूर्णक्षमतेने कार्यन्वित करावी.
- खडकवासला उजवा कालवा, डावा कालवा, जनाई शिरसाई व पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या बंद नलिका वितरण प्रणाली आदींच्या सुधारणेसाठी अशियन बँकेच्या सहकार्याने होत असलेल्या प्रकल्प अहवालाबाबत कार्यवाही करण्यात यावी.
- दौंड तालुक्यात सुमारे ६० हून अधिक कोल्हापूर पद्धतीचे बंधारे असून, जीर्ण झालेल्या बंधाऱ्यांच्या व्यवस्थेमध्ये बदल करण्यात यावी.
- पुणे व परिसरातील वाढते नागरीकरण, उद्योग यांचा विचार करता भविष्यात खडकवासला धरणाचे पाणी कमी पडण्याची शक्यता गृहीत धरून मुळशी धरणाचे पाणी पूर्वेकडे वळविण्याबाबत गठीत करण्यात आलेल्या समितीचे अहवाल व शिफारशी विचारात घेऊन त्यासंबंधी निर्णय प्रक्रिया गतिमान करण्यात यावी.
- दौंड तालुक्यातील कालवा लाभक्षेत्र व लाभक्षेत्राबाहेरील चिबड जमिनी निर्मूलन प्रक्रिया गतिमान करण्यात यावी.