योगेश शेंडगे
शिक्रापूर : शिरूर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी हद्दीत रणसिंग मळा येथून एक रोहित्र चोरीला गेल्याची घटना नुकतीच घडली. बुधवारी (दि.२८) मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी रस्त्याला लागून असलेले रोहित्र फोडून त्यातील धातू, ऑईल चोरून नेले. दुसऱ्या दिवशी गुरुवारी (दि.२९) मध्यरात्रीच्या सुमारास पारोडी हद्दीतील नदीकाठचे व गावालगत असणारे २ रोहित्र चोरीच्या उद्देशाने फोडले. परंतु त्या डिपीमध्ये ॲल्युमिनियम कॉइल असल्याने त्यांनी धातू नेला नाही. परंतु, दोन्ही फोडून टाकून त्याचे नुकसान केले. अशाप्रकारे रोहित्र चोरीचा सपाटाच लावला.
सकाळी तेथील शेतकऱ्यांनी याबाबतची माहिती वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकारी यांना दिली. यासंदर्भात महावितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता, वीज तंत्रज्ञ, विद्युत कर्मचारी यांनी पंचनामा करून शिक्रापूर पोलिसात तक्रार दाखल केली. पुढील तपास पोलीस करत असून, पोलिसांच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जीवाशी खेळ करत धाडसी चोरी
थ्री फेज वीजपुरवठा सुरू असताना रोहित्र चोरी करणे म्हणजे मृत्यूशी खेळण्यासारखे आहे. परंतु चोरटे हे काम अतिशय खुबीने करत आहेत. यामुळे चोरटे हे निश्चितच विद्युत कामासंदर्भात प्रशिक्षित असावेत. रोहित्र चोरी केल्यानंतर तांब्याची तार, इन्सुलेटिव्ह ऑइल चोरीस जात आहे. रोहित्रात 50 हजार मूल्याच्या तांब्याच्या कॉईल असतात. तर क्षमतेनुसार 190 ते 200 लिटर ऑइल असते. एका डीपीमधील ऑईल आणि धातूची किंमत अंदाजे तीन लाखापर्यंत असते.
शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ
एका विद्युत डीपीवर बरेच शेतकरी अवलंबून असतात. डीपी नसल्याने शेतकऱ्यांनी शेतीला पाणी कसे द्यावे, जनावरांना पिण्यास पाणी कोठून आणावे, असा प्रश्न त्यांना पडला आहे. सध्या शेतीमध्ये ऊस, कांदा अशी नगदी पिके आहेत. आत्ताच उन्हाळ्याचे दिवस सुरू झाल्याने पिकांना सारखे सारखे पाणी देणे आवश्यक आहे. पिके पाण्याचा ताण सहन करू शकणार नाहीत. शेतकऱ्याचे वार्षिक पिक वाया जाऊन मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
महावितरण कंपनीने तात्काळ रोहित्र बसवून सहकार्य करावे
महावितरण कंपनीने तात्काळ रोहित्र बसवून सहकार्य करावे व यापुढे अशा रोहित्र चोरीला आळा बसेल, अशी ठोस उपाययोजना करावी असे आवाहन दोन्ही गावातील शेतकरी बांधवांनी केले.