पुणे : गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होत आहे. रात्रीच्या वेळेस काहीसा गारवा तर दुपारच्या वेळेस उन्हाच्या चटक्यांचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरण देखील पहायला मिळत आहे. गेल्या दोन दिवसांपासून वादळी वारे, गारपीटीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अशातच मार्च महिन्याच्या १ आणि २ तारखेला अवकाळी पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पुणे वेध शाळेने दिलेल्या अंदाजानुसार, विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, वर्धा तसंच नागपूर शहराला पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय ढगांच्या गडगडाटांसह पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. खान्देश, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या भागात ढगाळ वातावरणसहित तुरळक ठिकाणी गडगडाटासह वीजा, सोसाट्याच्या वाऱ्यासहित पावसाची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.
मराठवाड्यामध्ये 2 मार्चपर्यंत पावसाची शक्यता
मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये 2 मार्चपर्यंत अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ढगाळ वातावरणासहित तुरळक ठिकाणी गडगडाटीसह अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर आजही मराठवाड्यात गारपीटीची शक्यता आहे.
कोकणात 2 दिवस राहणार ढगाळ वातावरण
पुढचे दोन दिवस कोकणातही काही ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि पाऊस अशी स्थिती असणार आहे. ढगाळ वातावरणसहित तुरळक ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे. 7 जिल्ह्यात 2 दिवस अशीच स्थिती असणार आहे.
स्कायमेटच्या अंदाजानुसार, 1 ते 3 मार्च दरम्यान पश्चिम हिमालयीन प्रदेशात गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. 1 मार्च रोजी जम्मू-काश्मीर, गिलगिट बाल्टिस्तान, लडाख, मुझफ्फराबाद आणि हिमाचल प्रदेशमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो. तर 2 मार्च रोजी विविध भागात मुसळधार ते अतिवृष्टी होऊ शकते आहे.