पुणे: मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी उपोषण सुरु केल्यानंतर मी त्यांची भेट घेतली होती. त्यानंतर मनोज त्यांच्याशी आजपर्यंत मी एकही शब्द बोललेलो नाही. तसेच आमची कोणतीही भेट झालेली नाही, असे स्पष्टीकरण शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे हेच मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या पाठीमागे असल्याचा आरोप केला होता. यावर बोलताना शरद पवारांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना चांगलेच फटकारले. जबाबदार पदावर बसलेली लोक एवढं पोरकट बोलतात, हे मी महाराष्ट्राच्या आजवरच्या इतिहासात कधीच पाहिले नाही, असा टोला त्यांनी लगावला. ते पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी शरद पवार यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याशी कोणतेही संबंध असल्याचे आरोप फेटाळले. जरांगे आणि माझा संबंध बघितला तर त्यांचे उपोषण सुरु झाल्यानंतर मी त्यांना भेटायला जालन्याला गेलो होतो. तेव्हा मी त्यांनी म्हणालो होतो की, तुमच्या मागण्या आणि आग्रह मी समजू शकतो. दोन समाजांमध्ये अंतर वाढेल, असं काही करु नका. महाराष्ट्राचं ऐक्य टिकेल, असे वागा, असे मी त्यांना सांगितले होते. त्यानंतर मनोज जरांगे यांच्याशी माझे एक शब्दही बोलणे झालेले नाही, असे शरद पवार यांनी सांगितले.
तसेच शरद पवार यांनी आमदार राजेश टोपे यांच्यावर भाजपकडून करण्यात आलेले आरोप फेटाळून लावले. टोपे यांच्यावरील आरोप साफ चुकीचे आहेत. मुळात राज्य सरकार हा प्रश्न सोडवण्यासाठी राजेश टोपे यांची मदत घेत होते. टोपे यांनी मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करावी, असे काही जबाबदार लोकांनी सुचवले होते. एका बाजूने त्यांची मदत घेतली जाते. मात्र, दुसरीकडे त्यांच्यावर आरोप केला जात असेल तर उद्या एखादा प्रश्न निर्माण होईल तेव्हा राज्य सरकारवर कोण विश्वास ठेवणार?, असा प्रश्न शरद पवारांनी विचारला.