दौंड : तालुक्यातील अनेक गावांमध्ये सार्वजनिक यात्रोत्सवाचे कार्यक्रम सुरु होत आहेत. यामध्ये अनेक धार्मिक तसेच मनोरंजनाच्या कार्यक्रमांचा समावेश असतो. या उत्सवात गोंधळ घालणाऱ्यांची गय केली जाणार नाही. यात्रोत्सवात आपल्याच माता-भगिनी, महिला-मुली येत असतात, त्यांची काळजी घ्या. तमाशात, जत्रेत धिंगाणा तसेच हुल्लडबाजी केली तर अशांवर गुन्हे दाखल करू, असा इशारा पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिला.
गोपाळवाडीचे ग्रामदैवत श्रीनाथ म्हस्कोबा व माता जोगेश्वरी यांच्या विवाहसोहळा यात्रोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या विशेष नियोजन सभेत ते बोलत होते. सध्या तालुकाभर सुरु होणाऱ्या यात्रोत्सवाच्या अनुषंगाने दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी ही बैठक घेतली होती. या वेळी बोलताना चंद्रशेखर यादव म्हणाले की, यात्रेत मनोरंजनाच्या कार्यक्रमांना मोठी गर्दी होते. अशावेळी मंचासमोर मोठे अंतर ठेऊन बॅरिकेड लावावेत. जेणेकरून प्रेक्षकांकडून कोणताही अनपेक्षित प्रकार घडणार नाही. कार्यक्रमासाठी आलेल्या लोकांच्या गर्दीवर लख्ख प्रकाश राहील याची व्यवस्था करावी, गर्दीत कोणताही गुन्हा घडणार नाही किंवा कुणी त्रास देण्याचा प्रकार घडणार नाही यासाठी सिसिटीव्ही कॅमेरे लावावेत. ही सर्व जबाबदारी यात्रा व्यवस्थापक, यात्रा कमिटी आदींनी घ्यावी.
या वेळी जेष्ठ नेते बबन लव्हे, सरपंच मनिषा होले, पोलीस पाटील वर्षा लोणकर यांच्या हस्ते पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर टेकवडे यांनी केले. आभार सुरेश होले यांनी मानले. या वेळी घेतलेल्या नियोजन सभेवेळी पोलीस जवान पांडुरंग थोरात, अमोल गारुडी, सुभाष राऊत, अमोल बोराडे, अमोल देवकाते, विजय पवार आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.