बीड : पाच वर्षांपूर्वी लिंग बदलाची शस्त्रक्रिया करुन पुरुषाचं आयुष्य जगणारा बीडचा हवालदार ललित साळवे याच्या आयुष्यात तब्बल पाच वर्षानंतर पुन्हा आनंदाची उधळण झाली आहे. १५ जानेवारी रोजी ललित बाबा झाला असून घरात गोड चिमुकल्याची एन्ट्री झाली आहे. ललितच्या पत्नीने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. चिमुकल्याचं आगमन झाल्यानं कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे.
बीडच्या पोलीस दलामध्ये कर्तव्यावर असलेले ज्या कुटुंबात जन्मले तेव्हा ते एक मुलगी म्हणूनच वाढले होते. अगदी बालवाडीपासून तर बारावीपर्यंत ललिता म्हणूनच त्यांनी शाळेत आणि महाविद्यालयात शिक्षण घेतलं आहे. मात्र आपण एक स्त्री नसून पुरुष असल्याचे जेव्हा त्यांना जाणवलं, तेव्हा त्यांनी लिंग बदलण्यात निर्णय घेतला. या निर्णयाला सुरुवातीला कुटुंबीयांनी विरोध केला.
मात्र त्यांच्यामध्ये असलेला पुरुष त्यांना शांत बसू देत नव्हता आणि त्यांनी शेवटी तीन वेळा सर्जरी करून आपण पुरुष असल्याचं दाखवून दिलं. त्यानंतर ललिताचा ललित झालेल्या ललितने एका मुलीसोबत लग्न केलं. तब्बल पाच वर्षानंतर त्यांच्या घरामध्ये एका गोंडस बाळाने जन्म घेतला आहे.
कोण आहे ललित साळवे?
‘ललिता साळवे’ यांचा ‘ललित’ होण्याचा प्रवास खूपच संघर्षमय होता. लहानपणापासून ललिताला आपल्या शरीरात काहीतरी गडबड आहे, असं वाटायचं. पण नेमकी काय समस्या आहे, हे स्पष्ट व्हायला बरीच वर्ष गेली. ललिताचं बालपण अतिशय कष्टात गेलं. तिचे आईवडील शेतमजुरी करायचे. मामाकडे राहून ललितानं शिक्षण पूर्ण केलं आणि विसाव्या वर्षी कॉन्स्टेबल म्हणून ती पोलीस खात्यात रुजू झाली.
आयुष्यात एका नव्या सुरुवातीकडे उमेदीनं ती पाहात होती, पण तीन-चार वर्षांत चित्र बदललं. जननेंद्रियाजवळ काही गाठीसारखं जाणवल्यानं ललिता डॉक्टरांकडे गेली होती. त्यावेळी ती स्त्री नसून पुरुष असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. तिच्या शरीरात पुरुष हार्मोन्स असल्याचं स्पष्टही झालं. डॉक्टरांचं निदान आणि शस्त्रक्रियेविषयी ऐकून ललिताही संभ्रमात पडली होती.