मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला तुतारी हे चिन्ह मिळालं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने त्यांना हे चिन्ह दिलं असून शरद पवार आता या चिन्हावर निवडणूक लढवणार आहे. या आधी केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार असं नाव दिलं होतं. आता चिन्हही बहाल केलं आहे. या संदर्भात शरद पवार गटाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन माहिती देण्यात आली आहे.
“एक तुतारी द्या मज आणुनि
फुंकिन मी जी स्वप्राणाने
भेदुनि टाकिन सगळी गगने
दीर्घ जिच्या त्या किंकाळीने
अशी तुतारी द्या मजलागुनी!”“महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवरायांच्या शौर्यानं ज्या तुतारीने दिल्लीच्या तख्ताच्याही कानठळ्या बसवल्या होत्या, तीच ‘तुतारी’ आज निवडणूक चिन्ह… pic.twitter.com/LsgvjlWzuN
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) February 22, 2024
शरद पवार गटाने ट्विट करत म्हटले आहे की, “महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवरायांच्या शौर्यानं ज्या तुतारीने दिल्लीच्या तख्ताच्याही कानठळ्या बसवल्या होत्या, तीच ‘तुतारी’ आज निवडणूक चिन्ह म्हणून निश्चित होणं ही ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार’साठी गौरवास्पद बाब आहे. महाराष्ट्राचं आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांनी, आदरणीय खा. शरदचंद्र पवार साहेबांच्या साथीने दिल्लीच्या तख्ताला हादरवून सोडण्यासाठी हीच ‘तुतारी’ पुन्हा एकदा रणशिंग फुंकण्याकरिता सज्ज आहे!” असंही पोस्टमध्ये लिहिण्यात आलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष नाव व घड्याळ हे चिन्ह अजित पवार गटाला देण्याचा निकाल केंद्रीय निवडणूक आयोगानं दिला. त्यानंतर शरद पवार गटाला नेमकं कोणतं नाव किंवा चिन्ह मिळणार? याची उत्सुकता राजकीय वर्तुळात होती. त्यासाठी शरद पवार गटाकडून तीन नावांचे पर्याय निवडणूक आयोगाला सादर करण्यात आले होते. त्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार असं नाव देण्यात आले. परंतु, हे नाव येत्या २८ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीपुरतं मर्यादित होतं. त्यामुळे या निवडणुकीकरता पक्षाला चिन्ह देण्यात आले नव्हते. त्यामुळे हे प्रकरण शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात नेले होते.
सर्वोच्च न्यायालयात नुकत्याच झालेल्या सुनावणीनुसार शरद पवार गटाला चिन्हासाठी निवडणूक आयोगात अर्ज दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले होते. तसंच, अर्ज दाखल झाल्यानंतर निवडणूक आयोगाने आठवड्याभराच्या आत चिन्हाबाबत निर्णय देण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार, शरद पवाग गटाने तीन पर्याय सुचवले होते. त्यापैकी केंद्रीय निवडणूक आयोगाने तुतारी या चिन्हावर शिक्कामोर्तब केले आहे.