यवत : यवत स्टेशन व उत्तर भागातील अनेक शेतकऱ्यांना दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेल्या यवत स्टेशन रस्त्याची दुरावस्था झाली असून, येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांकडून याबाबत नाराजी व्यक्त करत आहेत.
यवत स्टेशन हे गावापासून दोन किलोमीटर अंतरावर असून, अनेक दिवसांपासून हा रस्ता खराब झाला आहे. या रस्त्यामुळे शेतकऱ्यांचे, आजारी असलेल्या रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. दोनच दिवसावर यवत गावची यात्रा असून, या परिस्थितीमध्ये येथील नागरिकांना ये-जा करताना मोठी कसरत करावी लागू शकते. या रस्त्यावरुन दुचाकीही चालविणे मुस्कील होत आहे. शिक्षण, व्यवसाय, नोकरीसाठी अनेक विद्यार्थी, नागरिक, नोकरदार वर्ग रेल्वे वेळेत पोहचण्यासाठी वेगाने जात असतात. अशावेळी अचानक खड्डे येत असल्याने अनेक वेळा किरकोळ अपघात होत असल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले.
यवत स्टेशन रस्त्याने रोज अनेकजण ये-जा करत असून, खामगाव, राहू, उंडवडी यांसह शिक्रापूर, तळेगाव ढमढेरे व शिरूर तालुक्यासह पश्चिम भागाला जोडला जाणारा जवळचा मार्ग असल्याने बांधकाम विभाग, स्थानिक प्रशासन या रस्त्याच्या विषयामध्ये लक्ष देऊन येथील नागरिकांच्या दळणवळणाचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी येथील नागरिक करत आहे. याबाबत बांधकाम विभाग अधिकारी शिंदे यांना विचारले असता लवकरच खड्ड्यांची दुरुस्ती केली जाईल, असे सांगितले.