सांगली : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आगोदर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना भाजपकडून उपमुख्यमंत्री पदाची ऑफर देत भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याची विनंती करण्यात आली होती, असा गौप्यस्फोट जयंत पाटील यांचे विश्वासू सहकारी व राजारामबापू साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष पी.आर. पाटील यांनी केला आहे. ही ऑफर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती, असा दावाही पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यासोबत बोलताना केला. दीड वर्षांपूर्वी फडणवीस यांनी जयंत पाटलांना ही ऑफर दिली होती. या ऑफरबाबत खुद्द पाटलांनी आपल्यासह सहकाऱ्याशी चर्चा देखील केली होती, असेही त्यांनी म्हटलं आहे.
मात्र, जयंत पाटलांनी खासदार शरद पवारांसोबत राहण्याचा निर्धार करत फडणवीस यांनी दिलेली ऑफर स्वीकारली नाही,असेही पी.आर. पाटील यांनी सांगितले. सध्या जयंत पाटील यांच्याबाबत सुरू असणाऱ्या चर्चा या अफवा असून त्यावर कोणी विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी केले. सांगली जिल्ह्यातील कुरळपमध्ये एका कार्यक्रमात ते बोलत होते.