नागपुर : नागपुरात एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. पत्नीनं जेवण बनवण्यास नकार दिल्याने पतीनं पोरांना खोलीत कोंडून घर पेटवण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कोराडी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. रंजन शाव असं ४६ वर्षीय आरोपीचं नाव आहे. घरगुती वादाच्या या घटनेत इमारतीतील ३०-४० रहिवाशांचा जीव टांगणीला लागला होता. जवळपास २ तास हे थरारक नाट्य सुरु होतं. पोलीस आणि अग्नीशमन दलाच्या सकर्तमुळे मोठा अनर्थ टळला.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, नवरा-बायकोमध्ये जेवणावरून हा वाद सुरु होता. पत्नीने जेवण बनवण्यास नकार दिल्याने हा वाद झाला. त्यानंतर आरोपी पतीने पत्नी मीनू, १४ वर्षांचा मुलगा आणि ८ वर्षांच्या मुलीला घरात कोंडून ठेवलं. कुटुंबाला घरात ठेवताना आरोपी रंजनने घरगुती सिलेंडर गॅसचा पाईन काढला आणि हातात माचिस घेतलं. त्यामुळे इमारतील इतर नागरिकांचाही जीव धोक्यात आला. या परिस्थितीत शेजारील व्यक्ती कोणीही त्यांच्या मदतीला नाहीत.
इमारतीतील रहिवाशांना अखेर पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस अग्नीशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी रंजन याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र रंजन कुणाचंही ऐकण्याच्या स्थितीत नव्हता. घराचा दरवाजा बंद असल्याने आणि सिलेंडर स्फोटाचा धोका लक्षात घेऊन पोलिसांनी वेगळ्या पद्धतीने ही परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांनी एका वृद्ध व्यक्तीला रंजनची समजूत काढण्यासाठी पाठवलं. मात्र रंजनने त्या वृद्ध व्यक्तीच देखील ऐकलं नाही. मात्र पोलिसांनी संयमाने वृद्ध व्यक्तीच्या मुलीला आता पुढे पाठवलं. आपल्या वडिलांना सोडण्याची विनंती रंजनला करायला सांगितली. मुलीच्या विनंतीनुसार रंजनने दरवाजा खोलला, त्यानंतर पोलीस अग्निशमन दलाच्या जवानांनी घरात प्रवेश करून रंजन यांना ताब्यात घेतले. पत्नी मीनू यांनी प्रसंगावधान आणि समयसूचकता दाखवल्याने त्यांच्या कुटुंबासह संपूर्ण अपार्टमेंटच्या जीवाला होणार धोका टळला. या प्रकरणी आत्मघातकी प्रयत्न करणाऱ्या रंजन यांना अटक करून पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.