पुणे : भुसारी कॉलनी परिसरातील एका सदनिकेच्या खिडकीची काच भेदून बंदुकीची गोळी घरात शिरल्याने एकच खळबळ उडाली. ही घटना मंगळवारी दुपारी घडली. या प्रकारानंतर परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले.
भुसारी कॉलनीत राहुल टॉवर्स इमारत आहे. इमारतीत चौथ्या मजल्यावर विनय देशमुख यांची सदनिका आहे. त्यांनी त्यांची सदनिका भाडेतत्त्वावर दिली आहे. मंगळवारी दुपारी सदनिकेतील गॅलरीच्या काचेवर दगड मारल्यासारखा आवाज झाला. आवाज ऐकून घरातील सदस्य गॅलरीकडे पळाले. त्या वेळी काचेला मोठे छिद्र पडल्याचे लक्षात आले, तसेच घरात काचा विखुरल्याचे त्यांनी पाहिले. घरात एक काडतूस पडल्याचे त्यांनी पाहिले.
दरम्यान, भाडेकरूंनी त्वरित सदनिकामालक, सोसायटीतील रहिवासी आणि पोलिसांना ही माहिती दिली. त्यानंतर पोलीस उपायुक्त संभाजी कदम, कोथरुड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी चौकशी केली, तेव्हा भुसारी कॉलनी परिसरात डोंगर असून, लष्कराच्या संशोधन विकास संस्थेच्या आवारात गोळीबाराचा सराव सुरू असताना गोळी घरात शिरल्याची माहिती प्राथमिक तपासात मिळाली.
पोलीस निरीक्षक देशमाने यांनी हा कोणताही घातपाताचा प्रकार नसल्याचे सांगितले. पौड रस्त्यावर मेट्रो मार्गिकेचे काम सुरू असताना गोळी लागल्याने एक कामगार जखमी झाल्याची घटना दोन वर्षांपूर्वी घडली होती.