मुंबई : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्यावरून उद्धव ठाकरे यांच्याकडून टीका करण्यात येत होती. याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिश्किल शब्दांत उत्तर दिले. ‘उद्धव ठाकरे यांच्यासमोरच विधेयक पास झाले आहे. त्यांना असा प्रश्न पडण्याचे काही कारणच नाही. उद्धव ठाकरेंचा आमच्यावरच जास्त विश्वास आहे. त्यांचा विश्वास योग्य आहे, हेही आम्ही दाखवून देऊ’, असे ते म्हणाले.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी सरकारने मंगळवारी (दि.२०) विशेष अधिवेशन बोलावले होते. या विशेष अधिवेशनात मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला. या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले. राज्य सरकारने मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. यावर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे यांनी नोकरीतील आरक्षणाबाबत विधान केले होते. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टोला लगावत उत्तर दिले.
उपमुख्यमंत्री फडणवीस यांना माध्यमांनी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेबाबत विचारले असता ते म्हणाले, आता राज्यपालांच्या सहीने मराठा आरक्षणाचा कायदा पास झाल्यानंतर सर्व नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळणार आहे. तसेच त्यांना माहिती आहे की, मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात सवलात कोणी देऊ शकेल ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारच देऊ शकेल. तसेच मुस्लिम समाजाच्या आरक्षणाबाबत देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, याबाबतचे प्रश्न आपण उद्धव ठाकरेंना विचारा की, त्यांचे सहकारी काँग्रेस पक्षाचे नेते म्हणत आहेत की, मुस्लिमांना आरक्षण दिले जायला पाहिजे. हा प्रश्न माझ्यापेक्षा आपण उद्धव ठाकरेंना विचारु शकता’.
तसेच आमची पहिल्या दिवसापासून भूमिका पक्की आहे की, धार्मिक आधारावर आरक्षण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या संविधानात उल्लेख नाही. आम्ही संविधानाची शपथ घेतली आहे. त्यामुळे संविधानापेक्षा वेगळा निर्णय भाजप आणि महायुती सरकार घेऊ शकत नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले.
काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?
‘मला खात्री आहे, ज्या पद्धतीने अभ्यास करून हा प्रस्ताव मांडला गेला आणि विधेयक मंजूर झाले. याचा अर्थ असा की, कायद्याच्या सर्व निकषांवर हे आरक्षण टिकेल, अशी मला आशा आहे. कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण दिले, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले, त्याबद्दल धन्यवाद देतो. मराठा समाजातील बांधवांना कुठे आणि किती नोकऱ्या मिळणार आहेत, हेही सरकारने जाहीर केले तर सोन्याहून पिवळे होईल’, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते.