पुणे : आंबेगाव बुद्रुकच्या एका भामट्यानं गुंतवणुक केलेल्या रक्कमेवर जास्तीत जास्त परतावा देण्याच्या बहाण्याने एका तरुणाची 36 लाख 43 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे. याप्रकरणी आंबेगाव बुद्रुक येथील आरोपीवर भारती विद्यापीठ पोलिसांनी एमपीआयडी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार जुलै 2021 ते आज पर्यंत कात्रज व ऑनलाईन पद्धतीने घडला आहे.
याप्रकरणी निलेश उत्तम पाटील (वय – 29 रा. भारती विद्यापीठ मागे, पुणे) यांनी शनिवारी 17 फेब्रुवारीला भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन बाबासाहेब तानाजी भोसले (रा. सप्तगिरी सोसायटी, आंबेगाव बुद्रुक, जांभूळवाडी रोड) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, आरोपी भोसले याने फिर्यादी पाटील यांना सीएस मल्टीपर्पज को-ऑप सोसायटी लि. या फायनान्स कंपनीत उच्च पदावर असल्याचे सांगितले. तसेच तो एसबी मल्टी सर्व्हिस या कंपनीचा संचालक असल्याचे सांगितले. फिर्यादी पाटील यांचा विश्वास संपादन करुन या फायनान्स कंपनीत गुंतवणूक केल्यास जास्तीत जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवले.
आरोपी भोसले याने फिर्यादी पाटील यांना वेगवेगळ्या बँक खात्यात रोख स्वरुपात 36 लाख 43 हजार 200 रुपये भरा असे सांगितले. त्यानंतर फिर्यादी यांना कोणताही परतावा अथवा गुंतवणूक केलेली रक्कम परत न करता आर्थिक फसवणूक केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक वर्षा तावडे करीत आहेत.