जीवन सोनवणे
भोर : पुणे-सातारा महामार्गावरील शिवापूर वाडा येथील एका ज्वेलर्स मधील दागिने चोरणाऱ्या टोळीतील फरार आरोपीच्या राजगड पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. निलेश पांडुरंग डिंबळे(वय ३० वर्ष, रा. कल्याण, ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवापूर वाडा येथील आकांक्षा ज्वेलर्समधून एकूण ६,५८,००० रूपये किंमतीचे दागिने चोरल्याची घटना घडली होती. याप्रकरणी यशवंत राजाराम महामुनी (रा. शिवापूर ता. हवेली) यांनी राजगड पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली होती.
यावरून स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांनी कसून तपास करून सदर गुन्ह्यातील ७ आरोपी पैकी रोहित ऊर्फ बाबा प्रकाश साठे (वय २५ वर्षे, रा. सहकारनगर), निखिल भगवंत कांबळे (वय २८ वर्षे, रा. आई माता मंदिर, अप्पर), निलेश दशरथ झांजे (वय २५ वर्षे, रा. वडगाव झांजे ता. वेल्हे), शफीक मकसूद हावरी (वय १९ वर्ष रा. इंदीरानगर कुंभारवाडा), साहिल हनीफ पटेल (रा.लक्ष्मीनगर पुणे) यांना यापूर्वी अटक केले होते.
मात्र, फरार आरोपी निलेश डिंबळे हा कित्येक दिवस राजगड पोलिसांच्या ‘हातावर तुरी’ देत होता. दरम्यान, राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांना गोपनीय बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की, सदर आरोपी हा एका कार्यक्रमानिमित्त त्याच्या कल्याण (ता. हवेली) गावी निघालेला आहे. त्यांनी ही माहिती पोलिस उपनिरिक्षक दाजी देठे यांना दिली.
त्यांनी क्षणाचा विलंब न करता पोलीस अंमलदार अजित माने आणि राहुल कोल्हे यांच्या समवेत जाऊन रांजे (ता.भोर) येथील चितळे कंपनी जवळ सापळा रचून निलेश डिंबळे याला शनिवारी (दि. १७) दुपारी १ वाजता ताब्यात घेतले.
राजगड पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीस २० फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास राजगड पोलीस करीत आहेत.