पुणे : एखाद्या उमेदवाराला निवडणूकीत मतदारांची साथ मागण्याचा अधिकार आहे. पण, कुटुंबातील सर्व लोक एका बाजूला आणि मीच एकटा आहे असे सांगणे म्हणजे सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न आहे, असे म्हणत शरद पवार यांनी अजित पवार यांना प्रत्युत्तर दिले आहे. असे ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलतांना म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, “आम्ही भावनात्मक आवाहन करण्याचे कारण नाही. बारामतीचे लोक आम्हाला वर्षानुवर्षं ओळखतात. त्यामुळे आम्हाला त्याची गरज नाही”. अशी प्रतिक्रीया शरद पवार यांनी दिली. पण ज्याप्रकारे त्यांच्याकडून भूमिका मांडली जात आहे त्यातून वेगळं सुचवलं जात आहे. जनता त्यासंबंधी योग्य निर्णय घेईल याची मला खात्री आहे”, असे शरद पवार म्हणाले.
“मला अनेक कार्यकर्त्यांनी फोन येतात, त्यांना दमदाटी केली जाते असं सांगितलं जात आहे.” बारामती मतदारसंघात पहिल्यांदाच अशा गोष्टी होत आहेत, अशी खंतही शरद पवारांनी व्यक्त केली. त्याशिवाय, सुप्रिया सुळे यांच्याविरोधात सूनेत्रा पवार लढतीवर शरद पवार म्हणाले की, “लोकशाहीत निवडणुकीला उभं राहण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. त्या अधिकाराचा कोणी वापर करत असेल तर आम्ही तक्रार करण्याचं कारण नाही. आपण आपली भूमिका लोकांसमोर मांडत राहायला हवी”, असे ते म्हणाले.