पुणे : पुण्यातील औंध परिसरातील एका जेष्ठ दाम्पत्याची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. गुंतवणुक केलेल्या रक्कमेवर एक टक्का परतावा देण्याचे आमिष दाखवून सहा जणांनी एका ज्येष्ठ दाम्पत्याला ६० लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार २००८ मध्ये औंध येथील परिहार चौकात घडला. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी सात जणांवर MPID अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी बाणेर लिंक रोड येथे राहणाऱ्या प्रमिला ईश्वरसिंग गुप्ता (वय-७१, रा. औंध, पुणे) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुरुवारी १५ फेब्रुवारीला फिर्याद दिली आहे.
यावरुन द्वारका नारायण जालान (एचयूएफ), सदस्य सुधा द्वारका जालान, विजय जालान, संजय जालान, समीर जालान, प्रिया जालान (सर्व रा. दामोदर व्हिला, भंडारकर रोड, पुणे) यांच्यावर आयपीसी 406, 420, 34 सह महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम (MPID Act) कलम 3 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, आरोपी यांच्याकडे केंद्र सरकार, राज्य सरकार तसेच आरबीआय यांच्याकडील गुंतवणूक बाबतचा कोणताही परवाना नव्हता. असं असताना देखील आरोपींनी संगनमत करुन फिर्यादी आणि त्यांच्या पतीचा विश्वास संपादन केला. आरोपींनी त्यांना गुंतवणुकीचे आमिष दाखवून गुंतवणूक केलेल्या रक्कमेवर एक टक्का व्याज देण्याचे आमिष दाखवले.
त्यानुसार फिर्यादी आणि त्यांच्या पतीने ६० लाख रुपये आरोपींना दिले. मात्र, आरोपींनी पैसे घेतल्यानंतर कोणत्याही प्रकरचा परतावा अथवा मुळ रक्कम परत न करता आर्थिक फसवणूक केली. त्यामुळे सर्व आरोपींनी संगनमत करुन तक्रारदार व त्यांचे पती ईश्वरसिंह गुप्ता यांची ६० लाख रुपयांची फसवणुक करण्यात आली आहे. याबाबत सहाय्यक पोलिस निरीक्षक एस गायकवाड पुढील तपास करत आहे.