शिरूर: पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण अर्थात म्हाडाच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची नियुक्ती राज्य सरकारने केली आहे. त्यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा असणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेवरून आढळराव पाटील महाडाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनाचे सहसचिव अजित कवडे यांनी त्याबाबत जीआर काढला आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिरूर मतदारसंघातून शिवाजीराव आढळराव पाटील प्रबळ दावेदार असून म्हाडाचे अध्यक्ष पद मिळाल्याने अधिक वेगाने कामे होतील, अशी प्रतिक्रिया त्यांच्या कार्यकर्त्यांनी दिली आहे. दरम्यान प्रादेशिक मंडळाचे कामकाजाबाबत धोरण आखणे, आढावा घेणे, नियंत्रण करणे, प्रधानमंत्री आवास योजना आदी कामे म्हाडाच्या माध्यमातून करता येणार आहे.
या नियुक्तीनंतर माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले की, गोरगरिबांना स्वस्तात घरे मिळवून देणे, घरनिर्मितीचा लाभ मिळवून देणे तसेच जास्तीत जास्त लोकांना म्हाडाचा लाभ मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील असणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच राज्य सरकारने जो विश्वास दाखवला त्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले.