पालघर, (मुंबई) : वैतरणा खाडीत शार्क माशाने मंगळवारी ३२ वर्षीय तरूणावर हल्ला केल्याची घटना घडली होती. विकी गोवारी असं हल्यात जखमी झालेल्या तरुणाच नाव आहे. सध्या या तरुणावर सिलवासा येथील विनोबा भावे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, मादी जातीचा हा शार्क मासा मृत पावला होता. या शार्क माशाच्या पोटात तब्बल १५ पिल्ले सापडली आहेत. बुल शार्क मासा आहोटीला आल्याने त्याला माघारी जाता आले नाही.
मासा भरकटल्याने भरतीच्या वेळी खाडीपात्रात पोहोचला असावा, असा अंदाज वनविभागाचे मानद वन्यजीव रक्षक हार्दिक सोनी यांनी वर्तवला आहे. तसेच संरक्षित प्रजातींच्या अनुसूची १ मध्ये मोडत असल्याने या माशाच्या मृत्यूप्रकरणी वन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोर वन परिक्षेत्राच्या अधिकारी आणि कर्मचार्यांनी पंचनामा करून हा मृत मासा ताब्यात घेतला असून हा मासा डहाणू येथे नेण्यात आला आहे.
उपवन संरक्षक कार्यालयातील वाईल्ड लाईफ रेस्क्यू पथकाच्या ताब्यात या शार्क माशाला देण्यात आले असून या शार्क माशाचे वजन ४५० किलो आणि लांबी २.९५ मीटर असून जेसीबी मशीनच्या साहाय्याने मृत शार्क माशाला खाडी पात्रातून बाहेर काढण्यात आले आहे. माशाच्या गर्भाशयातून पिल्लू बाहेर येताना दिसणारी पिशवी दिसत होती.
तसेच गर्भाशयातून लहान बेबी बुल शार्क बाहेर येताना दिसत असल्याने सखोल गर्भाश्यात हात टाकून तपासणी केली असता अनेक बेबी बुल शार्क असल्याचे हाताला जाणवले. दरम्यान, गर्भाशयात एकूण १५ पिल्ले बाहेर काढण्यात आली. पिल्लांचे वजन ५ किलो पेक्षा जास्त होते. त्यांना शवविच्छेदन करून दफन करण्यात आले आहे.