मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष कोण हे मी ठरवू शकत नाही. विधीमंडळ पक्षात बहुमत कुणाचं या एकमेव निकष महत्त्वाचा आहे, असं म्हणत राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रताप्रकरणात निकाल दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा हे ठरवताना विधिमंडळ बहुमाताचा विचार करावा लागला. 53 पैकी 41 आमदार अजित पवार यांच्याकडे आहे. हे बहुमत शरद पवार गटाने नाकारले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवार यांचाच आहे, असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल देताना सांगितले आहे. यामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.
शरद पवार यांच्या नेतृत्वावर 29 जूनपर्यंत कोणताही वाद नव्हता, असं निरीक्षण राहुल नार्वेकर यांनी नोंदवलं. 2 जुलै 2023 अजित पवार यांच्या नेतृत्वातील एक गट सरकारमध्ये सहभागी झाला. त्यानंतर दोन्ही गटाकडून आपणच राष्ट्रवादी पक्ष असल्याचा दावा केला, असं राहुल नार्वेकर म्हणाले.“अध्यक्ष, वर्किंग कमिटी व नॅशनल कमिटी ही पक्षाची निर्णायक पद्धत दर्शवते. शिवसेना संदर्भात मी दिलेल्या निकालाचा दाखला याठिकाणी द्यावा लागेल. राष्ट्रवादी पक्षात अध्यक्ष पदावर दोघांकडून दावा केला जात आहे. दोन्ही गटांकडून पक्षाच्या घटनेप्रमाणे अध्यक्षाची निवड झाला नसल्याचा दावा केला जात आहे. दोन समांतर नेतृत्व या ठिकाणी उभे राहिले आहेत. तसेच दोन्ही गटांकडून अपात्रता याचिका दाखल करण्यात आल्या आहेत”, असं राहुल नार्वेकर म्हणाले.
“एनसीपी वर्किंग कमिटी ही पक्षाच्या घटनेप्रमाणे सर्वोच्च यंत्रणा आहे. त्यात १६ कायमस्वरूपी सदस्य आहेत. मात्र पक्षाची घटना कायमस्वरूपी सदस्यांना परवानगी देत नाही. नेतृत्व रचना, पक्षीय घटना आणि विधीमंडळ बळ पाहून पक्ष कुणाचा हे ठरवावे लागेल. यामध्ये पक्षीय घटना व नेतृत्व रचनेत सुस्पष्टता नाही”, असं निरीक्षण विधानसभा अध्यक्षांनी नोंदवलं.