पुणे : गरीब आहे, शेतमजुरीचे काम मिळेल का, अशी विचारणा करत, गोड बोलून वृद्ध महिलेसोबत जवळीक साधली. त्यानंतर चोरी करुन वृद्ध महिलेचा खून करुन फरार झालेल्या दाम्पत्याला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अहमदनगर येथून अटक केली आहे.
वृद्धेचा खून केल्याची घटना सोमवारी (ता. १२) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास जुन्नर तालुक्यातील मांजरवाडी येथे घडली होती. सुलोचना कोंडीभाऊ टेमगिरे (वय ७०, रा. मांजरवाडी, ता. जुन्नर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. सुलोचना टेमगिरे यांचा मृतदेह धनवटमळा या ठिकाणी आढळून आला होता. त्यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते. तसेच घरातील कपाटातील कपडे अस्ताव्यस्त पडल्याचे आढळून आले होते. हा गुन्हा भरदिवसा ग्रामीण भागातील लोकवस्तीत घडल्याने घटनेचे गांभीर्य वाढले होते.
याप्रकरणी शिवम ऊर्फ संकेत शाम श्रीमंत (वय २१), पुनम संकेत श्रीमंत (वय २०, दोघे रा. चिखली, ता. चिखली, जि. बुलढाणा) अशी अटक केलेल्या दाम्पत्याची नावे आहेत. या प्रकरणी नारायणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत नारायणागाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाण्यातील पथक तयार करण्यात आले होते. या पथकांकडून घटनास्थळाकडे येणाऱ्या सर्व रस्त्यांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत होते. याच दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला आरोपींची माहिती मिळाली. बुलढाणा जिल्ह्यातील एक दाम्पत्य खोडद परिसरात शेतमजुरी करण्यासाठी आले होते. हे दाम्पत्य आठ दिवसांपूर्वी अचानक निघून गेले. मात्र, ज्या दिवशी खूनाची घटना घडली, त्या दिवशी हे दाम्पत्य धनवटमळा परिसरात दिसल्याची माहिती मिळाली.
दरम्यान, पोलिसांच्या पथकाने संशयित जोडप्याची माहिती मिळवली. पथक बुलढाणा जिल्ह्यात जात असताना संशयित पती-पत्नी अहमदनगर बस स्थानक परिसरात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून टेमगिरे यांच्या घरातून चोरलेला ऐवज जप्त केला. दागिन्यांबाबत पोलीस आरोपींकडे चौकशी करीत आहेत.