सागर जगदाळे
भिगवण : भिगवण ग्रामपंचायतीमध्ये अनेक वर्षांपासूनचे भंगार व इतर अनावश्यक साहित्य पडून होते. त्यामुळे ग्रामपंचायतीने या साहित्याचा ओपन लिलाव करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पत्रा, लोखंड व इतर साहित्याच्या ओपन लिलाव प्रक्रियेतून भिगवण ग्रामपंचायतीला तब्बल २ लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम प्राप्त झाल्याची माहिती सरपंच दीपिका क्षीरसागर, उपसरपंच मुमताज शेख व ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय परदेशी यांनी दिली.
भिगवण ग्रामपंचायतीने स्वतःच्या ताब्यात असलेला पत्रा, लोखंड व इतर भंगार साहित्याची ‘जेथे आहे, जसे आहे, तसे’ अशा पद्धतीने लिलाव प्रक्रिया राबविली. यासाठी लिलाव बोली लावणाऱ्यांसाठी ५ हजार रुपये अनामत रक्कम तर २ हजार रुपये ‘ना परतावा’ रक्कम ठेवण्यात आली होती. एकूण ५ व्यक्तींनी यामध्ये सहभाग नोंदविला.
या लिलावाची प्रारंभिक बोली ४० हजार रुपये ठरविण्यात आली. यासाठी रीतसर जाहिरात व नोटीस प्रसिद्ध करण्यात आली होती. या ओपन लिलावासाठी इतर जिल्ह्यातील ठेकेदार आले होते. या वेळी ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, ठेकेदार, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.