खंडाळा : तालुक्यातील शिरवळ या ठिकाणी बारामती सहकारी बँकेने सीलबंद केलेल्या मिळकतीचे कुलूप तोडून बेकायदेशीररित्या प्रवेश करत अतिक्रमण केल्याप्रकरणी व खंडाळा तहसीलदार यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने दोघांविरोधात शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामती सहकारी बँकेच्या शिरवळ शाखेला खंडाळा तहसीलदार यांच्यामार्फत बँकेचे कर्जदार राहुल तारू यांची शिरवळ येथील तारू कॉम्प्लेक्स, तिसरा मजला, सी.स.नं.1031 ग्रा.मि.नं. 8749 चे एकूण क्षेत्र 2325 चौ.फू. व जामीनदार महेश विश्वनाथ तारू यांच्या मालकीची शिरवळ येथील ग्रा.मि.नं.1304 मधील 629 चौ.फू. या दोन्ही मिळकती सीलबंद अवस्थेत बँकेच्या ताब्यात देण्यात आल्या होत्या. याची कल्पना कर्जदार व जामीनदार यांना होती. तरीही बँकेला कोणतेही कल्पना न देता या मिळकतीवर कुलूप तोडत बेकायदेशीररित्या प्रवेश करून अतिक्रमण केले. तसेच तहसीलदार खंडाळा यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने राहुल सोपान तारू व शुभम महेश तारू (दोघे रा.शिरवळ ता.खंडाळा जि.सातारा) यांच्यावर मयूर जयप्रकाश जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस अंमलदार अंकुश गार्डी करत आहेत.