लोणी काळभोर (पुणे): थेऊर (ता. हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची पुढील महिन्यात होणारी निवडणुक बिनविरोध करण्यासाठी एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत निवडणुक बिनविरोध करण्यासाठी पुढाकार घेतलेल्या प्रमुख नेत्यांवरच शेतकऱ्यांबरोबरच नव्वद टक्क्यांहून अधिक इच्छुक उमेदवारांनी अविश्वास दाखविल्याने कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता धुसर बनल्याची चिन्हे दिसु लागली आहेत.
दरम्यान, कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी जाहीररित्या बोलणाऱ्या व्यासपीठावरील अनेक नेत्यांनी दुसरीकडे मात्र आपआपल्या समर्थकांना एकत्र करुन, गोपनीयपणे आपले पॅनेल बनवण्याचे काम पूर्ण करायला प्राधान्य दिल्याचा अनेक इच्छुकांनी आरोप केला. त्यानंतर कारखान्याची निवडणूक बिनविरोध होऊच शकत नाही, असे मत सभागृहात मागच्या रांगेत बसलेले सर्वसामान्य शेतकरी सभासदांनी यावेळी व्यक्त केले. तर दुसरीकडे उमेदवारी दाखल केलेल्या उमेदवारांच्या बरोबर झालेल्या चर्चेतून यशवंतची निवडणुक बिनविरोध होणे, ही बाब अंधश्रध्दा असुन निवडणूकीसाठी किमान दोन ते अडीच पॅनेल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
“यशवंत”च्या संचालक मंडळाची निवडणुक येत्या नऊ मार्च रोजी होणार असुन, संचालक मंडळाच्या एकवीस जागांसाठी विक्रमी असे तीनशे वीस उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अंतीम तारीख २७ फेब्रुवारी आहे. कारखान्याची निवडणुक बिनविरोध व्हावी, यासाठी मंगळवारी (ता. १२) लोणी काळभोर येथील गुलमोहर लॉन्स या ठिकाणी हवेली तालुक्यातील प्रमुख नेते, निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले उमेदवार व सभासदांची संयुक्त बैठक पार पडली.
या बैठकीसाठी आमदार जगन्नाथ शेवाळे, बाप्पू पठारे, जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप कंद, माजी संचालक प्रकाश म्हस्के, माणिक गोते, कारखान्याचे माजी अध्यक्ष प्रा. के. डी. कांचन, माजी उपाध्यक्ष माधव काळभोर, माजी संचालक सुरेश घुले, राजीव घुले, प्रताप गायकवाड, सुभाष काळभोर, महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर, महादेव कांचन, पांडुरंग काळे, देवीदास भन्साळी, रघुनाथ चौधरी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर, विद्यमान संचालक प्रकाश जगताप, रोहिदास उंद्रे, प्रशांत काळभोर, राजाराम कांचन, सुदर्शन चौधरी, हवेली पंचायत समितीचे माजी सभापती अशोक मोरे, अनिल टिळेकर, हिरामण तात्या काकडे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर कटके या प्रमुख नेत्यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
निवडणुक बिनविरोध का करावी याबद्दल आपले मत व्यक्त करताना प्रदीप कंद म्हणाले, कारखान्याच्या फक्त निवडणूकीवर लक्ष केंद्रित करु नका. एकमेकांबद्दल आकस न ठेवता गांभीर्याने विचार करुन पक्षीय मतभेद टाळून निवडणुक बिनविरोध करण्याकडे लक्ष द्या. कारखाना सध्या महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेच्या ताब्यात असून कारखाना सुरू करण्यासाठी राज्य सरकारची फार मोठी मदत लागणार आहे. कारखाना जर सुरु झाला तर आयुष्यभर निवडणूका लढवता येतील. परंतु, कारखाना सुरू झाला नाही तर ही शेवटची निवडणूक असेल. उमेदवारी अर्ज माघारी घेतले तरच ही निवडणूक बिनविरोध होऊ शकते, असं देखील कंद म्हणाले.
तर राजीव घुले म्हणाले, कारखान्यावर १४९ कोटी रुपये एवढे कर्ज आहे. कर्ज घेऊन कारखाना सुरू केल्यास कर्ज व त्यावरील व्याज दिल्यामुळे इतर कारखान्यांच्या तुलनेत साधारण एक हजार रुपये प्रतिटन बाजारभाव शेतकऱ्याला कमी मिळेल. कमी बाजारभाव मिळणार असेल तर कोणता शेतकरी कारखान्याला ऊस देईल, असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. कारखान्याची निवडणुक बिनविरोध झाली तरच कारखाना सुरु होऊ शकतो असे घुले म्हणाले.
प्रशांत काळभोर म्हणाले, येथे आलेल्या बऱ्याच लोकांच्या ओठात एक, पोटात एक असून वेगळेच काहीतरी करण्यासाठीच ते येथे आले आहेत. यापुर्वी ज्यांनी कारखाना बंद पाडला तेच लोक ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. निवडणूक खरोखरच बिनविरोध करायची असल्यास सर्वांना त्या प्रक्रियेत सहभागी करुन घेण्याची गरज आहे. तर प्रताप गायकवाड म्हणाले, यापूर्वी उच्चशिक्षित संचालक असतानाही कारखाना बंद कसा पडला? असा प्रश्न सभासदांनी माजी संचालकांना विचारण्याची गरज आहे.
यावेळी जगन्नाथ शेवाळे, देवीदास भन्साळी, प्रकाश जगताप, बाप्पू पठारे, राजाराम कांचन, सुदर्शन चौधरी, तात्यासाहेब काळे, सुरेश घुले, सुभाष काळभोर, लोणी काळभोरचे सरपंच योगेश काळभोर, कदमवाकवस्तीचे माजी सरपंच चित्तरंजन गायकवाड, नागेश काळभोर, विकास लवांडे, नवनाथ काकडे, जितेंद्र बडेकर, रोहिदास उंद्रे, युवराज कांचन, राजेंद्र कांचन, सुनिल कांचन यांनीही मनोगत व्यक्त केले. जिल्हा बॅंकेचे संचालक प्रदीप कंद, कारखान्याचे माजी संचालक राजीव घुले या दोघांच्या भाषणांना उपस्थितांनी चांगला प्रतिसाद दिला. काहीनी नेमका विषय मांडला तर अनेक वक्त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात न घेता राजकीय, वैयक्तिक भाषणबाजी केली.
मुंह मे राम …
निवडणूक बिनविरोध करण्यासाठी एक सर्वसामावेशक समिती बनवावी, अशी सुचना अनेक वक्त्यांनी मांडली. या मागणीवर कारखान्याचे माजी अध्यक्ष प्रा. के. डी. कांचन यांनी “कायदेशीरदृष्ट्या काहीच अर्थ नसलेल्या समिती”मधील सदस्यांची नावे पुकारण्यास सुरुवात केली. मात्र, यादी पुकारणाऱ्या प्रा. के. डी. कांचन यांच्यासह समितीमधील बहुसंख्य सदस्यांच्या नावावरुन व्यासपीठावरील नेते व उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या इच्छुक उमेदवारांमध्ये गोंधळास सुरुवात झाली. व्यासपीठावर बसलेले प्रमुख नेते व इच्छुक उमेदवार यांच्यात जोरदार खंडाजंगी झाली. व्यासपीठावरील नेत्यांबाबत बहुसंख्य इच्छुकांनी व त्यांच्या समर्थकांनी अविश्वास दाखवल्याने, समितीचा निर्णय प्रमुख नेत्यांना मागे घ्यावा लागला. समितीमध्ये येण्यासाठी एवढी चुरस असेल तर कारखान्याची निवडणूक बिनविरोध होऊच शकत नाही, असे मत व्यक्त करताना व्यासपीठावरील अनेक नेत्यांचा ‘मुंह मे राम..’ असा उपरोधिक उल्लेख उपस्थित सभासदांनी जाहीररित्या केला.
किमान दोन ते अडीच पॅनेल..
कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रकाश जगताप यांनी बिनविरोध निवडणुकीसाठी एकीकडे पाठिंबा व्यक्त करताना, दुसरीकडे निवडणूक बिनविरोध होणार नसेल तर स्वतंत्र पॅनेल उभा करण्याची जाहीर घोषणा केली. व्यासपीठावरील प्रमुख नेत्यांनी निवडणूक बिनविरोध करण्याची चर्चा जाहीररित्या करत असताना दुसरीकडे मात्र आपल्या समर्थकांच्या बैठका घेऊन पॅनेलची तयारी गोपनीयरित्या सुरु केल्याची चर्चा उपस्थितांमध्ये सुरु होती. प्रमुख नेते पॅनेल बद्दल बोलत नसले तरी, त्यांचे उजवे-डावे मात्र दादा, भाऊ, अण्णा पॅनेल उभे करणारच अशी भाषा करत होते. यामुळे मागील तेरा वर्षांपासून बंद असलेल्या व कर्जाच्या वजनाखाली दबल्या गेलेल्या कारखान्याच्या निवडणुकीसाठी किमान दोन अथवा अडीच पॅनेल उभे राहणारच, असे चित्र दिसून येत होते.