पुणे : अष्टविनायकांतील पवित्र असे तीर्थक्षेत्र श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणेश कवडे व विश्वस्त मंडळाच्या संकल्पनेतून श्री विघ्नहर मंदिराच्या मागील बाजूला ‘भक्ती शक्ती’ शिल्प, हिंदू राष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व वारकरी सांप्रदायातील सर्वोच्च संत, संत तुकाराम महाराज यांच्या भेटीचे भव्य वास्तूशिल्प उभारले आहे. या शिल्पाचा उद्घाटन सोहळा श्री गणेश जयंतीच्या शुभमुहूर्तावर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
राज ठाकरे यांनी सकाळी उद्घाटन सोहळ्यासाठी श्री क्षेत्र ओझर येथे उपस्थिती लावली. विघ्नहर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणेश कवडे, उपाध्यक्ष अजित कवडे, सचिव दशरथ मांडे, खजिनदार कैलास घेगडे, विश्वस्त रंगनाथ रवळे, आनंदराव मांडे, किशोर कवडे, मंगेश मांडे, कैलास मांडे, विजय घेगडे, श्रीराम पंडित, राजश्री कवडे यांनी राज ठाकरे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
विघ्नहर मंदिरामध्ये दर्शन घेऊन राज ठाकरे यांनी अभिषेक केला. श्री क्षेत्र ओझर नं १ व २ मधील ग्रामस्थ महिला, भाविक, मनसे कार्यकर्ते यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. सर्वांच्या उपस्थितीत देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणेश कवडे व विश्वस्त मंडळाच्या वतीने श्री विघ्नहराची प्रतिमा, शाल, श्रीफळ देऊन राज ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी राज ठाकरे यांनी श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टने उभारलेल्या भक्ती शक्ती या शिल्पाचे राज ठाकरे यांच्या शुभहस्ते अनावरण करण्यात आले. याप्रसंगी शरद सोनवणे, श्री विघ्नहर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय काळे, नगरसेवक बाबू वागसकर, मनसे नेते अजय शिंदे, जुन्नर तालुका मनसे प्रमुख मकरंद पाटे, समीर थिगळे, गणेश शेळके, साईनाथ ढमढेरे त्याचप्रमाणे महिला मनसे पदाधिकारी समस्त ग्रामस्थ ओझरकर व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.