पुणे : पुणेकरांसाठी महत्वाची अपडेट समोर येत आहे. मंगळवारी १३ फेब्रुवारी गणेश जयंतीनिमित्त शहरातील मध्यभागातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. वाहनचालकांना पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आले असून सर्व वाहनचालकांनी सहकार्य करावे, असं आवाहन वाहतूक पोलिसांनी केलं आहे. शहरात गणेश जयंतीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर येथे दर्शनाकरीता भाविकांची सकाळपासूनच मोठी गर्दी होत असते. याचा सर्वात मोठा फटका वाहतुक व्यवस्थेला बसतो. हीच बाब लक्षात घेता मंगळवारी वाहतूक पोलिसांनी शहरातील वाहतुकीत मोठे बदल केले आहेत.
या मार्गाचा करा वापर
- पूरम चौकातून बाजीराव रस्त्याने शिवाजीनगरकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी पूरम चौकातून टिळक रस्त्याने टिळक (अलका टॉकीज) चौक आणि पुढे नामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्त्याने (फर्ग्युसन रस्ता) जाता येईल.
- छत्रपती शिवाजी रस्त्याने स्वारगेटला जाणाऱ्या वाहनचालकांनी स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रस्त्याने खंडोजीबाबा चौक- टिळक चौकातून पुढे टिळक रस्त्याने इच्छितस्थळी जावे.
- स. गो. बर्वे चौकातून पुणे महापालिका भवनाकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रस्त्याने झाशी राणी चौकातून डावीकडे वळून जावे.
- अप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे येणारी वाहतूक बंद करून ती बाजीराव रस्त्याने सरळ सोडण्यात येईल, अशी माहिती देखील वाहतूक पोलिसांनी दिली आहे.