पुणे : पुण्यातील मध्यवर्ती भागात एका महिलेच्या खुनाची घटना उघडकीस आली आहे. मोबाईल चोरल्याच्या संशयावरुन दोघांनी महिलेला काठीने जबर मारहाण केली. या मारहाणीत महिलेचा मृत्यु झाल्याची घटना घडली. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी खूनाच्या गुन्ह्यात दोघांना ताब्यात घेतले आहे. वर्षा थोरात (वय ३५, रा. फिरस्ता) असं खून झालेल्या महिलेचे नाव आहे. अब्दुल सय्यद आणि गौरव चौगुले अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. ही घटना श्रीनाथ टॉकीजजवळ सोमवारी १२ फेब्रुवारीला सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, वर्षा थोरात ही फिरस्ता असून तिला दारुचे व्यसन आहे. अब्दुल सय्यद याची हातगाडी आहे. १०-१५ दिवसांपूर्वी अब्दुल याचा मोबाईल चोरीला गेला होता. हा मोबाईल वर्षा हिने चोरल्याचा त्याला संशय आला. त्यावरुन त्याने आणि गौरव यांनी वर्षाकडे मोबाईल बाबत विचारणा केली.
त्यावरुन त्यांच्यात वादावादी झाली. तेव्हा त्या दोघांनी वर्षा हिच्या डोक्यात काठीने मारहाण केली. वर्मी घाव बसल्याने वर्षा जागेवरच निपचित पडली. हे पाहून लोकांनी तिला रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीपूर्वीच तिचा मृत घोषित केलं. ही माहिती समजताच फरासखाना पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आहे.